कोरोनाकाळात नियमित लसीकरण पूर्ण होऊ न शकलेल्या पाच वर्षांखालील बालकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी राज्यभरात ‘इंद्रधनुष्य’ नावाने मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेच्या ४.० टप्प्याअंतर्गत २३ हजार बालके आणि अडीच हजार गरोदर मातांचे लसीकरण मार्चमध्ये पूर्ण झाले आहे. आता चालू महिन्यात सुमारे २२ हजार बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
कोरोना साथीचा परिणाम पाच वर्षांँखालील बालके आणि गरोदर मातांच्या नियमित लसीकरणावरही झाला आहे. या काळात लसीकरण पूर्ण होऊ न शकलेल्या बालकांचा, मातांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी केंद्रीय आरोग्य विभागाने फेब्रुवारी महिन्यात इंद्रधनुष्य मोहीम ४.० सुरू केली आहे.
राज्यात नऊ जिल्ह्यांमध्ये या मोहिमेअंतर्गत लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. यात बुलढाणा, वर्धा, औरंगाबाद, परभणी, नगर, नाशिक (ग्रामीण), जळगाव, पुणे (ग्रामीण), ठाणे (ग्रामीण) आणि मुंबई या जिल्ह्यांचा समावेश आहे. तीन टप्प्यांमध्ये हे लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. दीड वर्षांपर्यतचे नियमित लसीकरण पूर्ण झाले नसलेल्या बालकांचा यात प्रामुख्याने समावेश केलेला आहे. त्यामुळे दीड ते दोन वर्षांखालील बालकांचे सर्वेक्षण केले जात आहे. ज्या बालकांच्या लशींच्या मात्रा पूर्ण झालेल्या नाहीत, त्यांचे लसीकरण या मोहिमेत पूर्ण केले जाईल.
मोहिमेचा पहिला टप्पा मार्चमध्ये पूर्ण झाला असून यात २३ हजार बालकांचे लसीकरण करण्यात आले, तर अडीच हजार गरोदर मातांनाही लस देण्यात आली. आजारी असल्यामुळे, कोरोनाकाळात गावी किंवा अन्य ठिकाणी गेल्यामुळे बहुतांश बालकांच्या लशीच्या एक किंवा दोन मात्रा पूर्ण झालेल्या नाहीत. एकही मात्रा घेतलेली नाही अशा बालकांची संख्या फार कमी आहे. ज्या बालकांना आता दुसरी मात्रा दिली आहे. पुढच्या टप्प्यात तिसरी मात्रा दिली जाईल. यासाठी हे लसीकरण तीन टप्प्यांमध्ये राबविले जात असल्याचे राज्याचे लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ. सचिन देसाई यांनी सांगितले.
एप्रिलमध्ये याचा दुसरा टप्पा सुरू असून यात सुमारे २२ हजार बालकांचे लसीकरण पूर्ण केले जाईल. गरोदर माता यामध्ये फारशा नाहीत. मेमध्ये या मोहिमेचा शेवटचा टप्पा राबविला जाणार असून यात उर्वरित सर्व बालकांचे आणि गरोदर मातांचे लसीकरण पूर्ण केले जाईल. दुसरा टप्पा पूर्ण झाल्यावरच तिसऱ्या टप्प्यांमध्ये किती बालके शिल्लक आहेत, याची माहिती मिळेल, असे डॉ. देसाई यांनी सांगितले.