राज्यात विद्राव्य खतांची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. विद्राव्य खतांच्या पुरवठादारांनी आमच्याकडे खतांचा साठा नाही, आयात केलेली खते कधी येणार, याची शाश्वती नाही, असे सांगितल्यामुळे विद्राव्य खतांचा वापर करणारे शेतकरी अडचणीत आले आहेत. शिवाय विद्राव्य खतांच्या किमती सुमारे ७० टक्क्यांनी वाढल्यामुळे आयात केलेल्या खतांचा वापर करणे शेतकऱ्यांना शक्य होणार नाही. याचा परिणाम म्हणून शेतीमालाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. राज्यात एका वर्षांला सुमारे साडेचार लाख टन विद्राव्य खतांचा उपयोग केला जातो.
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाची खरड छाटणीसाठी लागणाऱ्या विद्राव्य खतांच्या नियोजनासाठी बैठक झाली. या बैठकीत विद्राव्य खतांच्या चार पुरवठादारांकडे खतांची मागणी केली असता, आमच्याकडे खतांचा साठा नाही. खतांच्या आयातीचे करार केले आहेत. पण, खते कधी येतील याची कोणतीही शाश्वती नाही, अशी माहिती पुरवठादारांनी दिली. इफ्कोसारख्या मोठय़ा कंपनीकडूनही असेच उत्तर मिळाल्याची माहिती संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार यांनी दिली.