जन्म.२९ एप्रिल १९५२
माधुरी पुरंदरे या अतिशय दर्जेदार आणि सहजसोप्या लिखाणातून लहान मुलांना वाचनाची गोडी लावून, पुस्तकांकडे ओढून नेणाऱ्या लेखिका म्हणून ओळखल्या जातात. त्या उत्तम गायिका, तसंच नाट्यअभिनेत्रीही आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे त्यांचे वडील आणि समाजपरिवर्तन, समाजप्रबोधन, स्त्री-शिक्षण, ग्रामविकास, बालवाड्या अशा अनेक आघाड्यांवर काम करणाऱ्या समाजसेविका निर्मला पुरंदरे ह्या त्यांच्या आई. माधुरी पुरंदरे यांनी मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून जीडी आर्टचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पॅरिस येथे जाऊन चित्रकला व ग्राफिक आर्ट यांचे शिक्षण घेतले. पुणे विद्यापीठातून त्यांनी फ्रेंच भाषेचा डिप्लोमाही केला. पुढे अनेक वर्षे त्यांनी अलीओंस फ्रांसेज संस्थेमध्ये फ्रेंच भाषा शिकवण्याचे कार्य केले. चित्रकला आणि साहित्य या दोनही क्षेत्रांत उत्तम गती असणार्या् माधुरी पुरंदरे यांनी बाल व कुमारांसाठी विपुल लेखन केले आहे. ‘आमची शाळा’, ‘राधाचं घर’, ‘यश संच’, ‘सख्खे शेजारी’, ‘पाचवी गल्ली’, अशा पुस्तकांतून त्यांनी मुलांच्या भावविश्वाचा आणि त्यांच्या आसपासच्या परिसराचा घेतलेला शोध मुलांप्रमाणेच मोठ्यांनाही भावणारा ठरला आहे. ‘वाचू आनंदे’ या पुस्तक-संचातून चांगल्या मराठी साहित्यातील निवडक वेच्यांची आणि त्या आधारे देशभरातील नामवंत चित्रकारांच्या चित्रांची आणि विविध चित्रशैलींची त्यांनी ओळख करून दिली. मुलांना भाषाभ्यासाची गोडी लागावी, त्यांची व्याकरणाची जाण वाढावी या हेतूने लिहिलेला ‘लिहावे नेटके’ हा पुस्तक-संच मुलांसाठीच नव्हे, तर मोठ्यांसाठीही भाषेचा अभूतपूर्व मार्गदर्शक ठरला. मुलांप्रमाणेच प्रौढांसाठीही त्यांनी उत्तम साहित्यनिर्मिती केली आहे. त्यांनी मराठीत लिहिलेल्या पिकासोच्या चरित्राला कोठावळे पुरस्कार मिळाला. मराठीतील कोसला, वाडा चिरेबंदी, बलुतं अशा दर्जेदार पुस्तकांचा त्यांनी फ्रेंचमध्ये अनुवाद केला आहे तर वेटिंग फॉर गोदो, लस्ट फॉर लाइफ, हॅनाज सूटकेस अशी जगप्रसिद्ध पुस्तके मराठीत आणली आहेत. आमची शाळा, बाबाच्या मिश्या, हॅनाची सुटकेस, हात मोडला, जादुगार आणि इतर कथा, कोकरू, फ्लॅट नंबर थर्टी सिक्स, लिहावे नेटके, मासोळी आणि चिमुकलं पाखरू, मोठी शाळा, मुखवटे, पाचवी गल्ली, शाम्याची गंमत व इतर कथा, सिल्व्हर स्टार, सुपरबाबा, Yash Big School, Yash Guest, झाडं लावणारा माणूस, चित्रवाचन, कंटाळा, मामाच्या गावाला, मोतिया, सख्खे शेजारी, वाचू आनंदे, व्हिन्सेट व्हॅन गॉग, परी मी आणि हिप्पोपोटॅमस, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. बालसाहित्यातील त्यांच्या एकंदर योगदानाबद्दल २०१४ साली साहित्य अकादमीने त्यांना सन्मानित केले आहे.