जन्म. २ एप्रिल १८९८ हैद्राबाद येथे.
हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांचे कुटुंब मूळचे बंगाली होते. त्यांचे वडील अघोरनाथ चट्टोपाध्याय हे एक वैज्ञानिक-तत्त्ववेत्ता आणि शिक्षणतज्ज्ञ होते तर आई बरदासुंदरी देवी या कवयित्री व गायिका होत्या. त्या बंगालीमधून कविता करीत असत. त्यांचे वडील एडिनबर्ग विद्यापीठातून विज्ञानशास्त्रातील डॉक्टारेट होते, त्यांनी हैदराबाद महाविद्यालयाची स्थापना केली होती. सरोजिनी नायडू या त्यांच्या भगिनी तसेच कम्युनिस्ट नेते विरेंद्रनाथ चट्टोपाध्याय हे त्यांचे बंधू होत. स्वातंत्र्य सैनिक, सहकार चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्या, पद्‌मविभूषण कमलादेवी चट्टोपाध्याय या त्यांच्या पत्नी होत्या. मात्र ते काही काळानंतर विभक्त झाले. कमलादेवी आणि हरिंद्रनाथ यांचा घटस्फोट हा भारताच्या कोर्टाने मंजूर केलेला पहिला कायदेशीर घटस्फोट होता. हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय नुसतेच अभिनेते नव्हते तर नेतेही होते. भारताच्या पहिल्या लोकसभेचे ते निवडून आलेले सदस्य होते.ते कम्युनिस्टांच्या पाठिंब्यावर खासदार म्हणून १९५२ साली त्यावेळच्या मद्रास राज्यातील विजयवाडा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. ते प्रामुख्याने इंग्रजीमध्ये कविता करीत. त्यांच्या इंग्रजी कवितांचे अनेक संग्रह प्रसिद्ध झाले. १९६२ मध्ये “साहिब बीबी आणि गुलाम’ या चित्रपटामध्ये त्यांनी पहिल्यांदा भूमिका केली. अनेक हिन्दी चित्रपटांमध्ये त्यांनी चरित्र अभिनेते म्हणून अभिनय केला. त्यांच्या “साहिब, बिबी और गुलाम’, “बावर्ची’ इ. चित्रपटांतील भूमिका विशेष गाजल्या. १९७२ मध्ये प्रदर्शित झालेल्या बावर्ची या विनोदी चित्रपटामध्ये त्यांनी खडूस कुटुंबप्रमुखाची भूमिका पार पाडली. त्यांची ही भूमिकाही प्रेक्षकांना आवडली होती. रॅप सॉंग हा कवितेचा एक प्रकार म्हणून, १९६० आणि १९७० च्या दशकात अमेरिकेत प्रचलित झाला. भारतात तो प्रथम हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी आणला. १९६६ मध्ये त्यांनी “रेल गाडी’ ही कविता लिहिली आणि अखिल भारतीय रेडिओवर रॅप मध्ये स्वतःच्या आवाजात गायली. लहान मुले आणि प्रौढांमध्येही हे गाणे इतके लोकप्रिय झाले होते की अशोक कुमार यांनी हे आपल्या ‘आशीर्वाद’ या चित्रपटासाठी वापरायचे ठरवले. या गीतामध्ये रेल्वेतून दिसणाऱ्या निसर्गाचे व शेतीचे वर्णन आहे, तसेच वाटेत येणाऱ्या स्टेशनची नावेही रेल्वेच्या ठेक्यासमध्ये बसविली आहेत. हे गीत अशोक कुमार यांनी स्वत: “आशीर्वाद’ चित्रपटात गायले होते. ‘जुली’ चित्रपटातील प्रीति सागर यांनी गायलेले “My heart is beating” हे गाणे पण हरिंद्रनाथ यांनी लिहीले होते. हरिंद्रनाथ यांनी अनेक गीते लिहिली, संगीत दिले आणि काही गाणी गायली. त्यांनी हिंदीमध्ये मुलांसाठी अनेक कविताही लिहिल्या.
भारत सरकारने १९७३ मध्ये हरिंद्रनाथ यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.
हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय यांचे २३ जून १९९० रोजी निधन झाले.