जन्म. २९ एप्रिल १९८० कोल्हापूर येथे.
मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपटामधील सध्याचे आघाडीचे नाव म्हणजे प्रियदर्शन जाधव. प्रियदर्शन जाधव हा मूळचा कोल्हापूरचा. २०१०मधील ‘विजय असो’ चित्रपटाद्वारे त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्याने ‘हापूस’ या चित्रपटासाठी सहदिग्दर्शक म्हणून काम केले. रवी जाधव दिग्दर्शित ‘टाइमपास’ या चित्रपटाची पटकथा त्याने लिहिली होती. त्यानंतर या चित्रपटाच्या ‘सीक्वेल’मध्ये लेखन आणि मुख्य भूमिका साकारण्याची संधी त्याला मिळाली. ‘धिंगाणा’, ‘हंपी’, ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’, ‘हलाल’, ‘सायकल’ हे त्याचे इतर काही चित्रपट होत. प्रियदर्शन जाधवच्या ‘फू बाई फू’मधील ‘स्कीट्स’ खूप गाजल्या. ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’ या मालिकेमधील त्याची भूमिका गाजली. ‘जागो मोहन प्यारे’ या नाटकाद्वारे त्याने रंगभूमीवरही चमकदार कामगिरी केली आहे. प्रियदर्शन जाधवने २०१८ मध्ये चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण केले असून, त्याचा ‘मस्का’ हा पहिला चित्रपट होता. ‘मस्का’ या चित्रपटानंतर प्रियदर्शन जाधवने दिग्दर्शक म्हणून ‘चोरीचा मामला’ हा दुसरा चित्रपट केला. या चित्रपटाची कथा प्रियदर्शन जाधवचीच आहे.