जन्म. २९ एप्रिल १९४३
१९७२ पासून चंद्रकांत मेहेंदळे यांनी आपल्या नाट्य कारकिर्दीला सुरुवात केली होती. गॉसिप ग्रुप या विजय बोंद्रे यांच्या संस्थेशी ते जोडले गेले. या संस्थेच्या अनेक नाटकांसाठी त्यांनी काम केले. अभिनय, पटकथा, दिग्दर्शन यावर त्यांनी प्रभुत्व मिळवले. त्यानंतर ते विनय आपटे यांच्यासोबत त्यांच्या गणरंग या संस्थेत कार्यरत होते. विनय आपटे आणि त्यांची मैत्री होती. चंद्रकांत मेहेंदळे यांनी अरूण साधू यांच्या कादंबरीवर आधारित बहिष्कृत नाटक लिहिले. हे नाटक त्यावेळी लोकप्रिय झाले. विनय आपटे यांच्यासोबत त्यांनी चाळ नावाची वाचाळ वस्ती या मालिकेच्या अनेक भागांचे लेखन केले. तसेच राज्य नाट्य आणि हौशी नाट्य स्पर्धेच्या रंगभूमीवर त्यांनी काम केले. १९९० पर्यंत त्यांनी नोकरी केली. नोकरी करत असतानाही ते रंगभूमीवर कार्यरत होते. १९९० नंतर त्यांनी व्यावसायिक रंगभूमीसाठी काम करण्यास सुरुवात केली. अनेक नवीन कलाकारांना त्यांनी मार्गदर्शन केले. आयएनटी, मृगजळ अशा स्पर्धांसाठी तसेच मटा सन्मानसाठीही त्यांनी नाटकांचे परीक्षण केले. त्यांनी रंगभूमीची सेवा करताना नवोदितांना वाचावे कसे, बोलावे कसे असे मोलाचे मार्गदर्शन केले. लोकांमध्ये वाचनाची आवड रुजावी यासाठी त्यांनी अभिवाचनाचे अनेक कार्यक्रम केले. विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघ (टिळक मंदिर संस्थेच्या) सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. या संस्थेमध्ये ते गणपतीसाठी नाटक बसवायचे.
अभिनेते राहुल मेहंदळे हे चंद्रकांत मेहेंदळे यांचे चिरंजीव. राहुल मेहंदळेने १९९२ साली प्रिय आई या नाटकातून रंगभूमीवर प्रवेश केला.त्या नंतर त्यांनी मी माझ्या मुलाचा,बॅरीस्टर अशा नाटकात कामे केली. त्यांची सून श्वेता मेहेंदळे या सुद्धा अभिनेत्री आहेत. चंद्रकांत मेहेंदळे यांचे ३० मे २०२० रोजी निधन झाले.