जन्म. २३ एप्रिल
‘प्रेम करुया खुल्लम खुल्ला’,’सगळीकडे बोंबाबोंब’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘दुर्गा झाली गौरी’, ‘मोरुची मावशी’ अशा कितीतरी चित्रपट, नाटकांच्या माध्यमातून कायम प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे किशोरी शहाणे. उत्तम अभिनयाच्या जोरावर किशोरी यांनी प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप उमटवली. त्यामुळे आजही त्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणूनच ओळखल्या जातात. किशोरी शहाणे या अभिनेत्री बरोबरच शास्त्रीय तथा नृत्यांगना म्हणुन प्रसिध्द आहेत. भारतात व परदेशात त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. ‘प्रेम करुया खुल्लम खुल्ला’ पासूनची त्यांची रुपेरी वाटचाल तब्बल पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळाची आहे. पण तरी त्या आजच्या पिढीच्या तारकेच्या स्पर्धेत कार्यरत आहे. किशोरी शहाणे यांचे शिक्षण मिठाबाई कॉलेज मध्ये झाले. त्यांना मिठाबाई कॉलेजमध्ये मिस मिठाबाई हा किताब मिळाला होता. त्यानंतर रंगभुमीवरुन त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. दुर्गा झाली गौरी, मी तुझ्या पाठीशी आहे, लंडनची सून, इंडस्ट्री हनीमून या नाटकात, व कांदेपोहे तुझ्या नि माझ्या प्रेमाचे, बेनी अँड बबलु अशा मराठी-हिंदी चित्रपटात त्यांनी भुमिका केल्या. मात्र मोरुची मावशी व आधेअधुरे या नाटकांतील अभिनयाने त्यांना खर्या अर्थाने यश आणि किर्ती मिळवुन दिली. किशोरी शहाणे यांचा पहिला चित्रपट प्रेम करू या खुल्लम. दिपक बलराज विज या हिंदी चित्रपट निर्मात्याने त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना आपल्या हिंदी चित्रपटांतुन संधी दिली. हफ्ता बंद हा त्यांचा हिंदीतील पहिला चित्रपट. पुढे इज्जत व बॉम्ब ब्लास्ट असे हिंदी चित्रपट किशोरी यांनी दिपक बलराज विज यांचेबरोबर केले. बॉम्ब ब्लास्ट मधेतर त्या मुख्य नायिकेच्या भुमिकेत झळकल्या. यातील त्यांच्यावर चित्रित झालेले लेना है लेना है.. हे गाणे चांगलेच लोकप्रिय झाले होते. हफ्ता बंद या चित्रपटाच्या चित्रिकरण दरम्यान किशोरी आणि दिपक बलराज विज यांचात जवळीक निर्माण झाली. त्याचे पर्यावसन आधी प्रेमात व पुढे लग्नात झाले. मोठ्या पडद्यावर यश मिळवल्यानंतर किशोरी शहाणे यांनी आपला मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला. घर एक मंदीर, जस्सी जैसी कोई नहीं, सिंदुर तेरे नामका, शक्ती – अस्तित्व के एहसास की, अभिमान, कोई अपनासा, कभी तो नजर मिलाओ, ऐसे करो ना वादा, यहाँ मैं घर घर खेली या सारख्या हिंदी तसेच स्वप्नांच्या पलिकडले, दोन किनारे दोघी आपण, दामिनी, वृदांवन,जाडूबाई जोरात या सारख्या मराठी मालिकांमधुन त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. व्हिनस म्युझिक कंपनीसाठी त्यांनी *सावरी* हा म्युझिक अल्बमही केला. संसारात रमलेल्या असतांना किशोरी यांनी चित्रपटांमधुन आपली दुसरी इनिंग सुरु केली. एक डाव धोबीपछाड, नवरा माझा नवसाचा,नारबाची वाडी या सारख्या मराठी चित्रपटांतुन घवघवीत यश संपादन केले. तर प्यार में ट्विस्ट, रेड – द डार्क साईड, मोहेंजोदरो या सारख्या हिंदी चित्रपटांमधुन वैविध्यपुर्ण भुमिका साकारात आपली अभिनय क्षमता पुन्हा पुन्हा सिध्द केली. एवढेच नाही तर किशोरी यांनी निर्मिती क्षेत्रातही यशस्वीरित्या पाऊल ठेवले. मोहत्यांची रेणुका या त्यांची निर्मिती असलेल्या चित्रपटाला बेस्ट एडिटींगसाठी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. साईबाबांच्या जीवनावर आधारीत मालीक एक या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन दिपक बलराज विज यांनी केले. यात अभिनेता जॅकी श्रॉफ साईबाबांच्या भुमिकेत होते. किशोरी यांनी ऐका दाजिबा या मल्टीस्टार मराठी चित्रपटाचीही निर्मिती केली. मिसेस ग्लॅडरॅग्ज या सौंदर्य स्पर्थेत त्या उपविजेत्या ठरल्या. भारतात तसेच अमेरिका, ऑस्ट्रेलिया या सारख्या परदेशांत त्यांच्या नृत्याच्या कार्यक्रमांना भरभरुन प्रतिसाद मिळतो. सिमरन या चित्रपटात त्यांनी कंगना रानावतच्या आईची भुमिका केली आहे. किशोरी शहाणे यांनी ‘स्टेप अप’ या नृत्यावर आधारित हार्टबीट या हॉलीवूड चित्रपटात काम केले आहे. किशोरी शहाणे सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय असून अनेकदा त्या त्यांचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. यात खासकरुन त्या सेटवरील त्यांचे डान्स व्हिडीओ शेअर करत असल्याचं पाहायला मिळतं. काही काळापूर्वी त्या बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात झळकल्या होत्या.