कोरोनामुळे मागील दोन वर्षांत आर्थिक संकटात सापडलेल्या आणि त्यातून थोडेसे बाहेर येणाऱ्या सर्वसामान्य आणि हातावर पोट असलेल्या मुंबईतील शेकडो गोरगरिबांना खाद्यतेलाचे भाव दुप्पट  झाल्याने जगणे मुश्किल झाले आहे. अनेकांनी आपल्या घरातील रोजच्या वापरातील तेलाच्या वापरावरच अंकुश आणला आहे; तर काहींनी तळणाच्या पदार्थांपासून स्वत:ला दूर ठेवत फोडणीच्या तेलाचीही काटकसर सुरू केली आहे.

खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले असल्याने गृहिनींचे गणितच बिघडले आहे. उन्हाळ्यात तयार करण्यात येणारे आणि वर्षभर पुरतील एवढ्या प्रमाणात बनवल्या जाणाऱ्या कुरड्या, पापड आदी तळणाचे पदार्थ बनविण्यास गृहिणींनी आता हात आखडता घेतला असल्याचे गृहिणींकडून सांगण्यात आले.

खाद्यतेलामध्ये वापरात येणाऱ्या प्रामुख्याने शेंगतेल, पामतेल, करडई, तीळ, सूर्यफूल, राई आदी सर्व खाद्यतेलांचे आणि त्यातील फिल्टर, रिफाईंड आणि खुल्या तेलाचे जवळपास भाव दुपटीहून अधिक वाढले आहेत.

यात होलसेल बाजारात १६० रुपयांना मिळणारे शेंगतेल हे ग्राहकांना १९० ते २०० रुपये किलोने मिळत असून १५ लिटरच्या डब्याची किंमत दोन हजार ९०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. सूर्यफूल, पामतेल, राईतेलांचे भावही वाढले असून दुसरीकडे करडई तेल तर बाजारात मिळणेही कठीण झाले आहे. जे मिळते त्यात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याने त्याचा वापरही कमी झाला असल्याचे सांगण्यात आले.

खाद्य तेलाचे भाव इतके वाढलेले असल्याने आमच्या घरातील फोडणीला वापरणाऱ्या तेलात काटसर सुरू केली. एक-एक थेंब जपून वापरतोय. कुरड्या, पापड आणि तेल अधिक लागत म्हणून लोणचेही घालण्याचा विचार सोडलाय.

तेलाशिवाय जेवणात चव येत नाही; परंतु त्याच्या किमती वाढल्याने सर्व चव निघून गेली आहे. सगळीच महागाई वाढली, आता त्यात तेलाने भर टाकली असल्याने सगळे गणित बिघडले आहे.

उद्योजक व्यवसायात गुंतवणूक करताना फायदा बघतच असतो. भाव आणखी वाढवतील. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि तेलासाठा करून ठेवलेली मंडळी यातून आपला अधिक नफा काढतील.