कर्जत । कडाव ग्रामपंचायत हद्दीत अस्वच्छतेच्या समस्या, सांडपाणी व्यवस्थापनचे तीनतेरा, अनधिकृत बांधकामे, बेकायदेशीर धंद्यांचे साम्राज्य वाढत चालले आहे. यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
कडाव ग्रामपंचायतीने स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फासल्याचे चित्र दिसत आहे. कडाव गावासह परिसरात सर्वत्र घाण आणि सांडपाण्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती आहे. ग्रामपंचायतीने काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चुन घंटागाडी आणली आहे; परंतु तिचा कसल्याही प्रकारे उपयोग केला जात नाही. कचरा संकलन आणि त्याची विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे कडाव बाजारपेठेत जागोजागी कचरा दिसत आहे. मोकळ्या जागेवर टाकत असल्यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढिग निर्माण झाले आहेत. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे
दुसरीकडे कडाव गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाजुला असलेल्या मोकळ्या मैदानाला कचऱ्याचा विळखा पडला आहे. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना तसेच रस्त्यावरुन चालणाऱ्या पादचारी आणि शालेय विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. बाजारपेठेतील व्यापारी, छोटे मोठे व्यावसायिक, मटण मच्छी विक्रेते यांच्याकडील कचरा ग्रामपंचायतीकडून संकलित केला जात नाही. कडाव गावातील ग्रामस्थ तेजस सुदाम पवाळी यांच्या शेजारी असलेल्या चाळीतील मलमुत्राचे सांडपाणी उघड्यावरुन वाहत असून सदर सांडपाणी हे त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या बोअरवेलमध्ये जाऊन बोअरवेलचे पाणी दूषित होत आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्ती, लहान मुले यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. ह्याबाबत त्यांनी वेळोवेळी कडाव ग्रामपंचायतीला सांगितले आहे. लेखी तक्रार अर्ज करुनही सांडपाण्याचे योग्य पद्धतीने विल्हेवाट केली जात नाही.कडाव गावातील तलावाशेजारी आणि इतर अनेक मोकळ्या भागात अनधिकृत अतिक्रमण करून बांधकामे करण्यात आली आहेत. त्याकडे ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष होत आहे.