कर्जत । कर्जत शहरातील मुख्य बाजारपेठतील एका कपड्याच्या दुकानाला आग लागून संपूर्ण दुकान आगीत खाक झाले आहे. या आगीत दुकानातील फर्निचर तसेच कपडे जळाले. त्यामुळे दुकानदराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कर्जत नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली. अन्यथा भयंकर दुर्घटना घडली असती.

कर्जत टिळक चौकातील बाजारपेठेत असणाऱ्या मयुरा हॉटेल समोर सद्भावना इमारतीत दर्शन कलेक्शन या कपड्याच्या दुकानाला गुरुवारी (२ जानेवारी) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. पहाटेच्या सुमारास ही आग लागल्याने यावेळी परिसरात सामसूम होती. नागरिक गाढ झोपेत होते. या आगीत दुकानातील कपडे, फर्निचर पूर्णतः जळून खाक झाले.

आगीच्या धुराचे लोट येथील पहाटेच्या सुमारास जाणाऱ्या कामगारवर्गाला दिसताच घटना उघडकीस आली. त्यानंतर अग्निशामक दलाशी संपर्क केला. लगेचच अग्निशामक दल आल्याने आग विझविण्यात आली. या दुकानाशेजारी असलेल्या हॉटेल मधील गॅस सिलेंडर या इमारतीत राहणाऱ्या सागर कांबळे आणि त्यांच्या मित्राने बाहेर काढले अन्यथा भयंकर दुर्घटना घडली असती.

राजस्थान येथील कालूसिंग राजपुरोहित हे गेली १५ वर्षे कर्जत येथे वास्तव्यास असून त्यांचे मालकीचे हे दुकान होते. १२ वर्ष ते दर्शन कलेक्शन या नावाने दुकान चालवत आहेत. त्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत ३५ लाखांचे नुकसान झाल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.