खोपोली । मुबंई पुणे एक्स्प्रेस वेवरील नवीन बोगद्यात मंगळवारी (३१ डिसेंबर) सकाळी एचसीएल केमिकलचे ड्रम घेऊन जाणाऱ्या ट्रकने समोरील अज्ञात वाहनाला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातानंतर ट्रकमधील केमिकलने भरलेले ड्रम रस्त्यावर पडले. त्यामुळे केमिकल रस्त्यावर पसरुन, परिसरात काही काळ उग्र वास पसरला होता.

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाताची मालिका सतत चालू असून मंगळवारी सकाळी चेन्नई येथून मुंबईच्या दिशेनेनिघालेल्या ट्रकला बोरघाटात आडोशी येथील नवीन बोगद्यात अपघात झाला. हा ट्रक एचसीएल केमिकलचे ड्रम घेऊन जात होता. नवीन बोगद्यात चालकाचेट्रकवरील नियंत्रण सुटले आणि त्याने समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिली. त्यामुळे ट्रकमधील ड्रम खाली पडले आणि त्यातून गळती होऊन हे केमिकल महामार्गावर पडले आणि काही काळ उग्र वास पसरला होता.अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस अपघातग्रस्त टीम, देवदूत यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. केमिकलचे ड्रम रस्त्याच्या बाजूला घेऊन केमिकल गळतीवर नियंत्रण आणण्यात आले तर काही काळानंतर रस्ता वाहतूकीसाठी चालू करण्यात आला.