कोरोनाकाळातील कामगिरीचे जिल्हाधिकार्यांकडून कौतुक
कोरोनाच्या काळात डॉक्टरांनी केलेल काम कौतुकास्पद आणि आदर्शवत आहे. सर्वच डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकीचे भान जीवाची पर्वा न करता कर्तव्याला प्राधान्य देत आपले काम चोख बजावले, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले. इंडियन मेडिकल असोसिएशन अलिबाग शाखेतर्फे डॉक्टर्स डेनिमित्त आयोजित डॉक्टरांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा चिकित्सक डॉ. सुहास माने, डॉ. प्रमोद गवई उपस्थित होते.
अलिबागमधील हॉटेल मॅपल आयव्ही येथे , कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास सर्व डॉक्टर्स आवर्जून उपस्थित होते.
प्रारंभ समीर नाईक यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. आयएमएचे अध्यक्ष डॉ. विनायक पाटील यांनी डॉक्टरांनी केलेली कोरोना काळातील सेवा, इतर समाजोपयोगी कामांची माहिती दिली. याप्रसंगी कोव्हिड काळात आयएमएच्या डॉक्टरांनी केलेल्या कामाबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. डॉ. शिवपाल तिवारी व डॉ. अरुण गवली यांनी अलिबागमधील नामांकित सर्जनना ‘आयएमए रत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी अलिबाग आयएमएच्या डॉक्टरांनी कोरोना काळात केलेल्या कामाची स्तुती केली. तसेच अलिबाग येथील वैद्यकीय मेडिकल कॉलेज लवकरात लवकर पूर्ण करुन चांगली रुग्णसेवा देण्याची ग्वाही दिली.कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता डॉ. विनायक पाटील, डॉ. समीर नाईक, डॉ. कृष्णा बडगिरे, डॉ. राहुल म्हात्रे यांनी मेहनत घेतली.