स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या अनेक सेवाभावी, देशभक्त संस्थांमध्ये ‘भारत सेवक समाज’चे स्थान वैशिष्टय़पूर्ण आहे. भारताच्या सेवेसाठी तरुण , त्यागी , निष्ठावान कार्यकर्ते घडवण्याच्या उद्देशाने विसाव्या शतकाच्या प्रारंभी म्हणजेच १२ जून १९०५ रोजी गोपाळ कृष्ण गोखले यांनी आपल्या काही जीवनव्रती मित्रांच्या सहकार्याने भारत सेवक समाजाची स्थापना केली.
गोखले यांनी स्थापन केलेली ही संस्था संख्यात्मक अंगाने विचार केला तर कधीच खूप मोठी झाली नाही आणि तरीही ती दखलपात्र ठरली. कारण तिच्या सदस्यांनी केलेल्या कार्याची गुणवत्ता. स्वातंत्र्योत्तर काळात सरकारने याच नावाची दुसरी संस्था पुरस्कृत केल्यामुळे संस्थेने आपले नाव बदलले आणि‘हिंद सेवक समाज’ असे नवे नाव सरकार दरबारी नोंदवले. जनसामान्यांच्या मनात मात्र ‘भारत सेवक समाज’ या जुन्या नावानेच ही संस्था आपला आब राखून आहे.
भारत सेवक समाजाची सुरुवात करण्यापूर्वीचे त्यांचे जीवनही नेमस्त देशकारणाला वाहिलेलेच होते आणि त्या देशकारणाला इंग्रजी अमदानीच्या प्रारंभापासून महाराष्ट्रात घडलेल्या बहुविध विचारमंथनाची व्यापक पाश्र्वभूमी होती. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांच्या संधिकाळात गोखले पुण्याच्या फग्र्युसन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करू लागले. त्यापूर्वी सुमारे दहा वर्षे ते टिळक- आगरकर- चिपळूणकर प्रभृतींनी स्थापन केलेल्या ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकवत होते. सोसायटीचे आजीव सदस्यही झाले होते. अवघ्या पस्तीस रुपयांच्या मासिक वेतनावर ती सेवा पार पाडताना सर्व संबंधितांची आर्थिक कुचंबणा होई. त्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी टिळक- आगरकरांप्रमाणेच गोखल्यांनीही विद्यार्थ्यांना उपयुक्त असे गणिताचे एक पुस्तक लिहिले होते. त्यात वापरलेली सोपी, साधी इंग्रजी भाषा व देशी उदाहरणे यांमुळे ते पुस्तक विलक्षण लोकप्रिय झाले. पुढे तर इंग्लंडमधील मॅक्मिलन कंपनीनेही ते प्रकाशित केले. त्याच्या अनेक आवृत्त्याही निघाल्या.
नरेन्द्र चपळगावकर यांनी ‘नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज’ या नावाने पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक छोटेखानी असले तरी आशयाच्या दृष्टीने समृद्ध आहे.