जीवनाच्या प्रत्येक समस्यांमध्ये मार्ग दाखवून योग्य मार्गदर्शन करणारे व जीवन जगण्याची योग्य कला शिकवणारे महानायक म्हणजेच गुरु होय.असे प्रतिपादन सरपंच डॉ.चेतन जावसेन यांनी गुरुपौर्णिमा निमित्ताने बोर्ली ग्रामपंचायत कार्यालयात
साने गुरुजी विद्यालयातील सन2021-22 या शैक्षणिक वर्षात दहावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी केले.
यावेळी साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपान अडसरेसहित शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी दहावी मध्ये पहिल्या पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या वैष्णवी नाक्ती,तेज डयला,गौरी राऊत,शिवानी पावसे,व संजोती घासमारे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित विद्यार्थी आणि ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सरपंच जावसेन यांनी सांगितले की,जीवनाच्या प्रत्येक समस्यांमध्ये मार्ग दाखवून योग्य मार्गदर्शन करणारे व जीवन जगण्याची योग्य कला शिकवणारे महानायक म्हणजेच गुरु होय. दरवर्षी गुरूंच्या सन्मानार्थ गुरुपौर्णिमा साजरी केली जाते
“गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः.”
अर्थात गुरु म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. गुरु ईश्वराचे दुसरे रूप असतात. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते. ज्या गुरुंनी आपले व्यक्तिमत्त्व घडविले त्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्याचा, त्यांना नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही संबोधले जाते. कारण आदिगुरू व्यासांचा जन्म या पौर्णिमेलाच झाला होता. कुंभार ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन विविध प्रकारचे आकार देत भांडे बनवतो. त्याचप्रमाणे गुरुरुपी शिक्षक हा सजीव मानवरुपी व्यक्तिमत्त्वाला आपल्या संस्कारांनी आदर्श घडवतात. गुरूचे ज्ञान सागराप्रमाणे अथांग आहे. आपण त्याच्यापुढे नम्र होऊन ज्ञान कण वेचले पाहिजे.
यावेळी साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपान अडसरे,यांच्यासाहित अन्य ग्रामस्थ यांनीसुद्धा मनोगत व्यक्त करीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.