गुड टच,बॅड टच, वयात आल्यावर होणारे बदल याविषयी मोकळेपणाने चर्चा….

खोपोली….

शैक्षणिक शेत्रात सहज सेवा फाउंडेशन सातत्याने भरीव कार्य करीत आहे. वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी पार पडलेली निसर्ग शाळा ही महाराष्ट्रात यशस्वी प्रयोग ठरलेला आहे.
शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्याच्या मनातील लैंगिक प्रश्नांना व शंकांना व्यक्त होण्यासाठी व माहिती जाणून घेण्यासाठी सहज सेवा फाउंडेशनच्या वतीने एक हक्काचं सहज व्यासपीठ शाळा व कॉलेज मधील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ आनंद शाळा,शीळफाटा येथुन दिनांक 28 जुन 2022 रोजी करण्यात आला. पुणे येथील डॉ. विशाखा पवार यांनी विदयार्थी व विद्यार्थिनींना सहजसुलभ भाषेत मार्गदर्शन केले. याचसोबत खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी या शिक्षणाचे महत्त्व विषद केले.
शाळेत व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनीमध्ये लैंगिक समस्या व शंका असतात.आजही समाजात मोकळेपणाने या विषयावर संवाद साधला जात नाही यातील अज्ञानामुळे विपरीत परिणाम सुध्दा शालेय व महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांच्या जडणघडणीवर होत असतात.
सहजसेवा फाउंडेशनच्या माध्यमातुन शहरी व ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या मध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी नामांकीत डॉक्टर्स व समुपदेशक यांच्या मार्गदर्शनाने शालेय वर्ष ( 2022-23) या वर्षात शाळांमध्ये सातत्यपूर्ण मार्गदर्शन आयोजित केले जाणार आहे.

याचसोबत खोपोली पोलीस स्टेशन, खालापूर पोलीस स्टेशन व कर्जत पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर क्राईम व ऑनलाईन फसवणूक कशी रोखता येईल यासाठी प्रबोधन आयोजीत करण्याचा संस्थेचा मानस आहे तसेच दहावी व बारावी नंतर काय करावे ? यासाठी शाळेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंद शाळेच्या संचलिका आसावरी दंडवते, मुख्याध्यापीका सीमा त्रिपाठी, उदय सागळे व आनंद शाळा स्टाफ तसेच सहजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे,उपाध्यक्षा इशिका शेलार, सचिव वर्षा मोरे, खजिनदार संतोष गायकर,कार्यवाह बी.निरंजन,महीला संघटक निलम पाटील,मार्गदर्शक मोहन केदार,सागरिका जांभळे यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी. सामजिक कार्यकर्त्या सायली साखरे, खोपोली पोलीस स्टेशनचे अजिंक्य पाटील व प्रभाकर मोहिते उपस्थित होते.
शाळेत व महाविद्यालयीन जीवनात लैंगिक शिक्षण हा खूप महत्त्वपूर्ण घटक आहे. विदयार्थ्यांमध्ये याविषयी जागृती निर्माण झाल्याने चुकीचे निर्णय घेण्याचे प्रमाण कमी होण्यास निश्चित मदत होईल.सामाजीक कार्यात या शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. असे प्रतिपादन डॉ. विशाखा पवार यांनी केले.

विद्यार्थ्यानी आपल्या आईवडीलांसोबत मनमोकळेपणाने संवाद साधला पाहिजे तसेच सोशल मीडियाचा वापर शालेय शिक्षणासाठी करीत असताना अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष केले पाहिजे.लैंगीक शिक्षणं हा आवश्यक घटक असुन सर्वच शाळांमधून प्रसार होणे गरजेचे आहे, असे आवाहन खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी केले आहे.