३० मे जेष्ठ तबला वादक पं. अनिंदो_चॅटर्जी यांचा वाढदिवस.
जन्म. ३० मे १९५४ साली कोलकाता येथे.
आई-वडीलांनी ‘पाचू गोपाल’ या देवतेला बोललेल्या नवसाने झालेले पोर, म्हणून पाचू गोपाल हेच त्यांचे नाव घरच्यांनी ठेवले. पुढे विश्वविख्यात सतारवादक पंडित निखिल बॅनर्जी यांनी त्यांचे ‘आनिंदो’ असे नामकरण केले. पण अनिंदो दादांना घडवले, ते त्यांच्या काकांनी. अनिंदो चॅटर्जी यांचे काका पं. देवीप्रसाद चॅटर्जी हे नामवंत सतार वादक व आकाशवाणी मान्यता प्राप्त कलाकार होते. पं.अनिंदो चॅटर्जी हे उस्ताद हाजी विलायत खॉँ यांनी स्थापन केलेल्या फरुखाबाद घराण्याचे प्रतिनिधित्व करतात. या घराण्याचा लौकिक म्हणजे उस्ताद हबीबूद्दीन खॉँ, उस्ताद करामतुल्ला खॉँ, उस्ताद मुनीर खॉँ, पद्मविभूषण उस्ताद अहमदजान थिरकँवा यांनी वादन व शिष्य वर्ग तयार करुन खूप प्रसार केला. अशा या घराण्याची प्रतिष्ठा व नावलौकिक वाढवण्यात अनिंदो चॅटर्जी यांचे खूप मोठे योगदान आहे. अनिंदोजींचे प्रथम शिक्षण उस्ताद अफाक हुसेन यांच्याकडे झाले. त्यानंतर पश्चिम बंगालमधील नामवंत विद्वान गुरू पं. ग्यानप्रकाश घोष (ग्यानबाबू) यांच्याकडे गुरुकुल पद्धतीने तबल्याची तालीम अत्यंत शिस्तबद्ध व डोळसपणे अनेक वर्ष मिळाली. त्यामुळे अनिंदोच्या सांगितिक व्यक्तिमत्वात सांगितिक विचार, सादरीकरण व साथसंगत यात अल्पावधीत परिपक्वता आली. त्यामुळे पं. अनिंदो चॅटर्जी हे नाव संगीत विश्वात नैसर्गिकरित्या खूप प्रसिद्ध झाले. तशी पंडितजींची ज्ञानलालसा खूप आहे. मुळातच फरुखाबाद घराण्यावर लखनऊ घराण्याचा खूप असर. त्यामुळेच अनिंदोजींनी अनेक दुर्मिळ कायदे, जोडकायदे, गती, गततोडे रेले, बंदिशी तसेच तबला वादकाच्या शारीरिक क्षमतेचा कस पाहणाऱ्या रचना स्वतः पंडितजी अत्यंत लिलया (कृष्णाने करंगळीवर गोवर्धन पर्वत जसा पेलला तसा) वादन सहजपणे करतात. पं.अनिंदो चॅटर्जी यांचे तबला वादन अत्यंत गतीशील, सुस्पष्ट, नादमय, ओेघवत व अत्यंत श्रवणीय करतात. तबल्यातील जास्तीत जास्त उच्च खानदानी भाषा त्यांच्या वादनातून ऐेकावयास मिळते. उदा. (तीट, कडधा, धिनगीन, नानागीन, धातीगीन, दिंग दिना, त्रक, तिरकीट, धिरधिर, धिनधिन इत्यादींनी युक्त) अनेक कायदे, जोडकायदे, गतकायदे गती, तुकडे, रेले व असंख्य जून्या खानदानी चीजा यांचा खजिना त्यांना मुखोद्गत आहेच पण त्याचा ते प्रत्यक्षवादनातून अविष्कार करतात. वादन करत असताना वादनातील एखादा नवीन विषय ओेघात आला त्याचा विस्तार (उपज) ते अत्यंत नजाकतीने, कलात्मक बुद्धीने खुलवतात. त्यातूनच त्यांच्या सांगितिक प्रतिभेची अनुभूती श्रोत्यांना येते. अनिंदोजींची तबलावादन तंत्रावर अत्यंत हुकूमत आहे. त्यामुळे त्यांच्या मनाप्रमाणे हात चालतो, पण ते गिमिक्स विस्मयकारक, आश्चर्य वाटण्यासारख्या सांगितिक कसरती टाळतात. किंबहुना नुसत्या टाळ्या मिळविण्याकरिता ते तंत्राचा गैरवापर टाळतात. तबल्याची शुद्ध, उच्च साहित्यिक मूल्य असणारी भाषा ते तबलावादनात वापरतात. त्यामुळे त्यांचे वादन अत्यंत प्रभावी असरदार व समजदार श्रोत्यांना अंतर्मूख करणारे ठरते. वाद्याची साथ संगीतातील पं.अनिंदो चॅटर्जी यांचा हातखंडा आहे. बऱ्याच प्रतिभावान तंतकारांचा ते साथीला हवे असा आग्रह असतो. यातूनच त्यांच्या साथीबद्दलचा विश्वास दिसून येतो. अनिंदोजींनी सतारवादक पं. रवी शंकर, उ. विलायत खॉँ, पं. निखिल बॅनर्जी, उ. रईस खॉँ, उ. शाहिद परवेझ, पं. बूधादित्य मूखर्जी, सरोद वादक उ. अली अकबर खॉँ, उ. अमजद अली, पं. तेजेंद्रनारायण मुजूमदार, पं. बुध्ददेवदास गुप्ता, पं. शिवकुमार शर्मा, पं. हरिप्रसाद चौरासिया, गंगूबाई हनगळ, पं. मल्लिकार्जून मन्सूर, पं. अजय चक्रवर्ती, पं. बिरजू महाराज अशा दिग्गज कलाकारांबरोबर आपल्या साथीने त्यांनी देश विदेशात मैफली सजवल्या. तसेच त्यांनी भारतात व परदेशात एकल कार्यक्रम केले आहेत. १९७० साली हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये तसेच अमेरिकेतील राष्ट्रपती भवनात २०१० मध्ये बराक ओेबामा यांच्यासमोर त्यांनी वादन केले आहे. पं. अनिंदो चॅटर्जी यांच्या वादनाच्या चाहत्यांमध्ये सामान्य श्रोत्यांबरोबर उ. झाकीर हूसेन, पं. सुरेश तळवलकर, पं. कुमार बोस, पं. योगेश समसी व समकालीन अनेक तबला वादकांचा समावेश होतो. स्वतः अनिंदो अत्यंत मृदूभाषी आहेत. कुठल्याही तऱ्हेचे वलय ते स्वतः बाळगत नाही. त्यामुळे सामान्य श्रोता त्यांच्याशी सहज संवाद साधू शकतो. त्यामुळेच त्यांच्याबद्दल चाहत्यांना खूप आपूलकी वाटते. त्यातून कलाकाराने सामान्य बनून कसे वागावे याचा परिपाठ अनिंदोजींनी घालून दिला आहे. पं.अनिंदो चॅटर्जी यांना २००२ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.