जन्म. ५ मे
स्नेहा रायकर या माहेरच्या वैशाली चोरणकर.
कल्चरल अॅक्टिव्हिटीजना प्राधान्य देणाऱ्या शिरोडकर हायस्कूलमध्ये स्नेहा रायकर यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं. पुढे हॉस्पिटॅलिटी कन्झ्युमर स्टडीसाठी कॉलेजला अॅडमिशन घेतल्यानंतर त्यांच्या कलागुणांना फारसा वाव मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी एका खासगी कंपनीत नोकरी स्वीकारली. त्यानंतर तेथे त्यांना अभिनयाचं क्षेत्र खुणवू लागलं. त्यामुळे स्नेहा रायकर यांनी विनायक पडवळ यांच्या अभिनय शिबिरात प्रवेश घेतला. दरम्यान अनेक एकांकिका त्यांनी केल्या. जयंत पवार लिखित ‘जळीताचा हंगाम’, अजित भगत दिग्दर्शित ‘झाला अनंत हनुमंत’ या प्रायोगिक नाटकात काम करण्याची संधीही त्यांना मिळाली. नाटकात स्थिर होणार असं वाटत असतानाच त्या ऑफिसमधल्या संदीप रायकर याच्या प्रेमात पडल्या आणि त्यांच्याशी लग्न करून ती स्नेहा रायकर झाली. त्या वेळी काही काळ त्यांनी ब्रेक घेतला. मग आपल्या पतीच्या प्रोत्साहनामुळे स्नेहा रायकर यांनी अभिनय क्षेत्रात शिरण्याचा पुन्हा प्रयत्न सुरू केला. मित्रमैत्रिणींच्या मदतीने त्यांनी अनेक ठिकाणी ऑडिशन दिली. तब्बल आठ वर्षांच्या कालावधीनंतर ‘कुमारी गंगुबाई नॉन मॅट्रिक’ मालिकेमधून स्नेहा रायकर यांनी पुनरागमन केलं. त्यानंतर ‘अधुरी एक कहाणी’ मध्ये छोटासा रोल करण्याची संधी त्यांना मिळाली. कॅमेऱ्यासमोर सहजतेने वावरणाऱ्या स्नेहा यांना दादा गोडकर यांच्या ‘ह्या गोजिरवाण्या घरात’ मालिकेत रोल मिळाला. ‘अवघाची संसार’, ‘आपली माणसं’, ‘चार दिवस सासुचे’, ” वरचा क्लास” या मराठी मालिकांबरोबरच ‘छुना है आसमान को’ या हिंदी मालिकेतही त्या झळकल्या. ‘मनात माझ्या’ हे स्नेहा रायकर यांचे पहिलं व्यावसायिक नाटक होते. यात त्यांची मुख्य भूमिका आहे. ‘सिद्धिविनायक महिमा’, ‘धूडगूस’, “बेधडक, ‘अनान’, दमछाक, ‘गुरुदक्षिणा’, ‘What’s up लग्न’ या चित्रपटात स्नेहा रायकर यांनी अभिनय केलाय. ‘नोकिया मोबाइल’, ‘बिग बजार’च्या बरोबर इतरही टीव्ही अॅड्समध्येही त्यांनी काम केलंय. ‘सोनी लिव’वरील फुल ताईट या वेब सीरिजमध्ये स्नेहा रायकर यांची यतीन कार्येकर यांच्या बरोबर मुख्य भूमिका आहे. स्नेहा रायकर यांचे सध्या ट्रान्स Affair हे नाटक रंगमंचावर चालू आहे. त्या कथ्थकही शिकलेल्या आहेत.