१८१८ च्या इंग्रज-मराठा युद्धानंतर परतीच्या वाटेवर निघालेल्या इंग्रज बटालियनचा पाडाव अजिंठा गाव परिसरात पडला असता १८१९ साली स्थानिकांच्या माहितीवरून वाघाच्या शिकारीस निघालेला, मद्रास आर्मीतील २८ क्रमांकाच्या घोडदळ तुकडीतील एक ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ याला अज्ञातवासात असलेली अजिंठा लेणी दिसली. सदर अधिकाऱ्याने नेहमीप्रमाणे आपल्या दैनंदिनीमध्ये २८ एप्रिल १८१९ ला अजिंठा लेणी स्थापत्य, शिल्प, चित्रांचे दर्शन झाल्याचे नोंदवले. क्र. १० च्या लेण्यांतील १३ व्या खांबावर John Smith 20th cavalry 28 April 1819 असा शिलालेख आहे.जॉन स्मिथ या अधिकाऱ्याची दैनंदिनी मद्रास येथून कोलकाता आणि तेथील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या लंडनस्थित मुख्यालयात पोहोचली. तेथील वाचनात अजिंठा लेणी स्थापत्य शिल्पचित्रांचा उल्लेख आला. त्याची दखल कंपनीने घेऊन भारतस्थित ‘रायल एशियाटिक सोसायटी’ला सदर लेण्यांचा अभ्यास व संरक्षण करण्याचे आदेश दिले. त्या आदेशानुसार १८२२ मध्ये सर विल्यम एर्स्किन यांनी आपल्या लेखनात जॉन स्मिथ दैनंदिनी ईस्ट इंडिया कंपनीचे निर्देशनासह अजिंठा लेणी स्थापत्य, शिल्प व चित्रांची चर्चा केली आहे. इसवी सन पूर्व २०० च्या सुमाराला लेणी खोदण्यास सुरुवात झाली होती. पैठणच्या सातवाहन घराण्यातील सम्राटानी याची सुरुवात केली. सातवाहन काळात ८, ९, १०,१२, १३ आणि १५ या लेण्यांचे खोदकाम पूर्ण झाले. पुढे जवळपास ५०० वर्षे खोदकाम बंद होते त्यानंतर पुन्हा पाचव्या शतकात गुप्त , वाकाटक आणि बदामीच्या चालुक्यांनी येथील लेण्यांचे खोदकाम सुरु केले. अजिंठ्यात एकंदर २९ लेण्या असून त्या बौध्दधर्मीय आहेत. तिथे ५ चैत्य आणि २४ विहार आहेत. तिसावी लेणी अर्धवट अवस्थेत असून इतर लेण्यांमधील कालात्मक अशा विविध प्रकारच्या चित्रांमधून त्या काळातील संस्कृती आणि सामाजिक गोष्टीचं रुप आपल्यासमोर उभे राहते. अजिंठा लेणी ही जागतिक वारसा स्थान म्हणून युनेस्कोने इ.स. १९८३ साली घोषित केली. ही लेणी जंगलांनी पूर्ण वेढली गेलेली असल्याने मानवाला अज्ञात राहिली आणि म्हणूनच ती टिकली असेच म्हणावे लागेल.
Home Uncategorized २८ एप्रिल औरंगाबादजवळील अजिंठ्याची लेणी लोकांच्या दृष्टिपथात आणली या घटनेला आज दोनशे...