जन्म.२६ एप्रिल
शिल्पा नवलकर यांचे वडील प्रमोद नवलकर हे जेष्ठ राजकारणी असले तरी ते कसलेले लेखक होते.
संवेदनशील लेखिका आणि गुणी अभिनेत्री अशी ओळख असणाऱ्या शिल्पा नवलकर या इंग्रजी माध्यमात शिकलेल्या असून पठडीत न बसणाऱ्या नाटकाचे मालिकेचे, पटकथाचे लिखाण करतात. वेगळा विषय, वेगळी मांडणी, प्रेक्षकांना लिखाणातून दिला जाणारा सामाजिक संदेश ही त्यांच्या लिखाणाची खासियत आहे. स्वत: लेखिका असूनही, त्या अभिनय करताना सगळं स्क्रिप्ट नीट वाचतात. ‘दुर्गा झाली गौरी’ या बालनाट्यापासून अभिनयाचं बाळकडू घेतलेली आणि जीवनाकडे सजगपणे व डोळसपणे बघणारी ही बुद्धिमान अभिनेत्री व लेखिका शिल्पा नवलकर यांनी अमोल पालेकर यांच्या हिंदी चित्रपट ‘कैरी’ मधून पदार्पण केले. शिल्पा नवलकर यांनी अजित भुरे यांच्या पहिल्या नाटकात १९८४ साली अभिनेत्री म्हणून काम केलं होतं. ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ ही त्यांची पहिली दूरदर्शन मालिका होता. मालिकेत अभिनय करत असतानाच त्यांनी ‘या सुखांनो या’, ‘मृगजळ’, ‘कुलवधू’, ‘बंध रेशमाचे’ या मालिकांचे लेखन केले व अनेक चित्रपटांचे स्क्रीनप्लेही लिहिले. त्याच्या संवेदनशील निरीक्षणातून लिहिलेले ‘सेल्फी’ नाटक अंतर्मुख करायला भाग पाडतं. ‘सेल्फी’, लेखिका म्हणून त्यांचे पहिलं नाटक होते.शिल्पा नवलकर यांना या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट लेखिकेचा मानही पटकावला. २०१६ मध्ये त्यांना सेल्फी या नाटकासाठीच्या सर्वोत्कृष्ट लेखनासाठी म टा सन्मान पुरस्कार मिळाला होता. सेल्फी या नाटकानंतर नंतर देखील त्यांनी बरचं लिखाण केलं. शिल्पा नवलकर यांच्या लेखणीतून भद्रकाली प्राँडक्शनचे गुमनाम है कोई ! या नाटकाची संहिता आकारास आली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरच्या ‘गोठ’ मालिकेतील पटकथा त्यांनी लिहिली आहे.