- माथेरान मध्ये महाराष्ट्र दिन साजरा !
माथेरान नगरपालिका झाली ११७ वर्षाची,
माथेरान पालिकेचा ११७ वा वाढदिवस उत्साहात साजरा.
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६२ वा वर्धापन दिन माथेरान मध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला.महाराष्ट्र दिन,कामगार दिन आणि त्याच बरोबर माथेरान नगरपालिका स्थापनेला ११७ वर्ष पूर्ण झाली. अश्या त्रिवेणी संगमाच्या निमित्ताने येथील नौरोजी उद्यानात उत्साहात आणि आनंदात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
माथेरान या पर्यटनस्थळाचा शोध १८५० साली एका ब्रिटीश अधिकाऱ्याने लावला.त्यानंतर १ मे १९०५ साली माथेरान गिरीस्थान नगरपालिका स्थापन केली.माथेरान पालिकेला ११७ वर्ष पूर्ण झाली असून त्या निमित्ताने माथेरान येथील नौरोजी उद्यानात संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याच बरोबर १ मे महाराष्ट्र दिन निमित्त सकाळी ८:१५ वा.नगरपालिका कार्यालयात येथे मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या अर्ध पुतळ्याला नगरपालिका अभियंता स्वागत बिरंबोळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण,वीर हुतात्मा भाई कोतवाल यांच्या अर्ध पुतळ्यास नगरपालिकेचे लेखापाल अंकुश ईचके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण,स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृती स्तंभास नगरपालिकेचे अभिमन्यू यळवंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण, हुतात्मा स्मारक येथे हुतात्मा भाई कोतवाल यांच्या प्रतिमेला स्नेहा साकळेकर यांच्या हस्ते पुष्पहार,हुतात्मा भाई कोतवाल स्मारक येथे स्वातंत्र्य सैनिकांच्या नामफलकास नगरपालिकेच्या सहाय्यक परिचारिका स्नेहा गोळे यांच्या हस्ते पुष्पहार,आणि हुतात्मा स्मारक येथील हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या शिल्पास सुमन शिवते आणि मीनाक्षी दिघे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच सायंकाळी ७:३० वा नौरोजी उद्यानात देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी सफाई कामगार कमल गायकवाड यांच्या प्रामाणिकपणा बद्दल त्यांचा विशेष सत्कार मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच यावेळी सर्व कामगारांना सुद्धा कामगार दिनानिमित्त प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.माथेरान नगरपालिकेचा ११७ वा वाढदिवस सर्व मान्यवरांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला.यावेळी माथेरान मधील सर्व पक्षीय नेतेमंडळी,नागरिक आणि पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.