जन्म. १६ फेब्रुवारी १९३३ नाशिकच्या जवळील मिग ओझर येथे.
भावगीत, भक्ती गीतातून प्रबोधन करणारे कवी म्हणून हरेंद्र जाधव यांची ख्याती होती. हरेंद्र जाधव हे पेक्षाने शिक्षक होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे प्रभावीत होऊन ते समाजकार्यात ओढले गेले. त्यावेळी जलसा मंडळांकडून मोठ्या प्रमाणावर प्रबोधन केलं जात होतं. जाधव यांनाही लिहिण्याची गोडी लागली आणि त्यांच्या सिद्ध हस्त लेखणीतून अनेक बहारदार गाणी उतरली. वयाच्या १७ व्या वर्षीच त्यांनी पहिलं गाणं लिहिलं होतं. मात्र, हे गाणं रेकॉर्ड करण्यासाठी त्यांना तब्बल दहा वर्ष वाट पहावी लागली होती.
हरेंद्र जाधव यांनी पहा पहा मंजुळा, हा माझ्या भीमरायाचा मळा… तुच सुखकर्ता तुच दुखहर्ता, अवघ्या दिनाच्या नाथा… माझ्या नवऱ्यानं सोडलीय दारू… हा संसार माझा छानं, राव दिला मला देवानं… आता तरी देवा मला पावशील का?, सुख ज्याला म्हणतात ते दावशील का? आदी गाणी लिहीली आहेत. त्यांनी आतापर्यंत दहा हजाराच्यावर गाणी लिहिली आहेत. त्यापैकी त्यांची काही गाणी मुंबईतील सेंटर प्रकाशनाने नऊ भागांत पुस्तकरूपात प्रकाशित केली आहेत. लोकगायक रंजना शिंदे, श्रावण यशवंते, प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप, आनंद शिंदे यांसह अजित कडकडे, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, बेला सुलाखे, साधना सरगम या प्रतिथयश गायकांनी आणि आंबेडकरी चळवळीतील अनेक शाहिरांनी त्यांची गाणी गायिली आहेत.
हरेंद्र जाधव हे लोकशिक्षकही असल्याने, त्यांना आदराने ‘गुरुजी’ या उपाधीने संबोधले जात होते. एक जिज्ञासू, मितभाषी, संयमी, संवेदनशील, परंतु कवी मनाचा चिंतनशील सर्जक अशी त्यांची ओळख प्रचलित राहिलेली आहे. प्रसिद्ध लोककवी व शाहीर वामनदादा कर्डक यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता. त्या स्नेहातूनच नाशिकमध्ये स्थापन झालेल्या ‘महाकवी वामनदादा कर्डक’ प्रतिष्ठानाशी त्यांचे अतूट नाते होते. हरेंद्र जाधव यांचे २५ एप्रिल २०२१ रोजी निधन झाले.





















