जन्म. ११ जून १९४२ रोजी कारवार येथे.
कादंबरीकार, कवी, समीक्षक अशी बहुआयामी ओळख असलेले विलास सारंग यांचे कॉलेज शिक्षण मुंबईत झाले. इंग्रजी विषयात एम.ए, तसेच डब्ल्यू. एच्. ऑडन या इंग्रजी कवीवरील प्रबंधलेखनासाठी मुंबई विद्यापीठाची १९६९ साली पीएचडी आणि अमेरिकेतील इंडियाना विद्यापीठात तौलनिक साहित्याभ्यास या विषयात त्यांनी पीएचडी मिळवली.
आंतरराष्ट्रीय मान्यता असलेले मराठी लेखक विलास सारंग यांच्या साठी नोबेल पुरस्कारविजेते विख्यात लेखक सॅम्युअल बेकेट यांनी सारंग यांच्यासाठी अमेरिकी प्रकाशकाकडे शिफारस केली होती. सारंग यांच्या मराठी कथा पेंग्विन प्रकाशनने सारंग यांच्याकडूनच इंग्रजीत अनुवादित करून घेतल्या होत्या. सन १९७५ मध्ये ‘सोलेदाद’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह प्रसिद्घ झाला. ‘आतंक’ हा कथासंग्रह, तसेच ‘एन्कीच्या राज्यात’, ‘रुद्र’, ‘अमर्याद आहे बुद्घ’ या त्यांच्या कादंबऱ्या गाजल्या. सामाजिक, राजकीय घटनांवर भाष्य करणारा ‘१९६९-१९८४’ हा काव्यसंग्रह, तसेच ‘सिसिफस आणि बेलाक्वा’, ‘मराठी नवकादंबरी’, ‘अक्षरांचा श्रम केला’, ‘सर्जनशोध आणि लिहिता लेखक’ ही समीक्षालेखांची पुस्तके आदी त्यांची मोलाची साहित्यसंपदा आहे.
१९७८ रोजी त्यांचा ‘अ काइंड ऑफ सायलेन्स’ हा इंग्रजी काव्यसंग्रह प्रसिद्घ झाला. त्यांच्या कथांचे इंग्रजी व फ्रेंच भाषांतील अनुवाद विविध इंग्रजी नियतकालिकांतून प्रसिद्घ झाले. सन २००५ मध्ये त्यांची ‘द डायनोसॉरशिप’ ही इंग्रजी कादंबरी प्रसिद्घ झाली. या पुस्तकांनी सारंग यांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून दिली होती .काफ्का, सार्त्र, काम्यू व बेकेट या युरोपीय अस्तित्ववादी लेखकांचा परिचय करून देणारे ‘सिसिफस आणि बेलाक्वा’ हे समीक्षेचे पुस्तक सारंग यांनी लिहिले. मराठीतल्या ‘कोसला’, ‘अजगर’, ‘सात सक्कं त्रेचाळीस’, ‘सूर्य व हॅट घालणारी बाई’या कादंबऱ्यांचे विश्लेषण सारंग यांनी ‘मराठी नवकादंबरी’ या समीक्षापुस्तिकेत केले. विलास सारंग यांचे १४ एप्रिल २०१५ रोजी निधन झाले.