कर्जत । रत्नागिरी जिल्ह्यातील ३३ वर्षीय योगेशयशवंत हुमणे हा तरुण आणि सुंदर मुलींना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याकडे आकर्षित करून जवळीक वाढवायचा. त्यातून लग्नाचे आमिष दाखवून फसविणारा हा महाठग अखेर नेरळ पोलिसांच्या हाती लागला आहे. आपल्या पहिल्या पत्नीला भेटायला आलेला योगेश हुमणे सध्या नेरळ पोलिसांच्या कस्टडी मध्ये आहे. नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील बोपेले येथे राहणाऱ्या ३४ वर्षीय विवाहितेने आपल्या पती विरोधात तक्रार दाखल केली होती. योगेश यशवंत हुमणे यांच्या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे या करीत होत्या. बोपेले येथील ३४वर्षीय तक्रारीदार महिलेने पतीच्या विरोधात मानसिक छळवणूक आणि आर्थिक फसवणूक तसेच पतीचे या आधी लग्न झाले असताना माझी फसवणूक करून माझ्यासोबत दुसरे लग्न केल्याचे नमूद केले होते. त्याने अनेक महिलांना लग्नाचे आमिष दाखवून १५ ते २० लाखांची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
योगेश याने अविवाहित असल्याचे भासवून पीडितांना लुटले आहे. दोन मुलींची लग्न करून तिसऱ्या मुलीच्या सोबत लग्न करण्याची तयारी त्याने सुरू केली होती. मात्र त्याआधी नेरळ पोलिसांच्या जाळ्यात तो सापडला आहे.





















