नेरळ येथील रहिवासी आणि रायगड जिल्हा परिषदेमधील आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असलेले डॉ. सागर काटे यांनी अन्य सात आरोपी यांनी नोकरीचे आमिष दाखवून चार जणांना गंडा घातला आहे. त्यातील तीन जणांना रेल्वेत नोकरी लावतो म्हणून आणि एकाला मंत्रालयात चालक म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवले होते. दरम्यान, नेरळ पोलीस ठाण्यात त्याबाबत गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात डॉ. सागर दत्तात्रय काटे यास अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेशदिले आहेत.
रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात सेवेत असलेले डॉ. सागर काटे यांनी त्या ठिकाणी देखील नोकरीचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केली असल्याची चर्चा होती. २०२३ पासून डॉ. सागर काटे यांनी आपले सहकारी मुंबई येथील चिंतन हर्षददास शहा उर्फ चेतन मेहता, नवी मुंबई येथील राहुल उर्फ आशिष रामभाऊ वाघ, विशाल वसंत निवरे, तसेच राजदीप उर्फ राहुल दीपक उर्फ दिपकदास अमोल उर्फ प्रदीप निवेणकर आणि नवी मुंबई येथील सचिन हंबीर पाटील उर्फ शंभूदास यांच्या माध्यमातून फसवणूक सुरु केली. डॉ. सागर काटे यांच्यावर विश्वास ठेवून मध्य रेल्वेमध्ये बुकिंग क्लार्क पदाची नोकरी लावतो म्हणून नेरळ गावातील निलेश दत्तात्रय भिसे यांचा मुलगा प्रथमेश याला नोकरीला लावण्यासाठी सहा लाख रुपये उकळले होते. प्रथमेश निलेश भिसे याला नोकरी लावली जात नसल्याने आणि नोकरीचे आमिष दाखवणारे डॉ. सागर काटे यांनी आयोजित केलेल्या मुलाखती या बोगस असल्याचे सिद्ध झाल्यावर आपले सहा लाख रुपये बुडाले असल्याची खात्री झाली. त्यानंतर एप्रिल २०२४ मध्ये निलेश दत्तायेत्र भिसे यांनी आपली फसवणूक झाली असल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर नेरळ पोलीस ठाण्यात वरील आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नेरळ पोलिसांच्या पथकाने आतापर्यंत नितीन महादू वाघ आणि राहुल उर्फ आशिष रामभाऊ वारे या दोघांना अटक केली आहे तर अन्य सहा आरोपी फरार असून, त्यातील चिंतन उर्फ सहा हा मरण पावला आहे. फरार आरोपींमध्ये डॉ. सागर काटे यास नेरळ पोलिसांच्या पथकाने अटक केली असून, कर्जत न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.