७ मे ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा-कादंबरीकार पन्नालाल_पटेल यांचा जन्मदिन.
जन्म: ७ मे १९१२ – मांडली, डुंगरपूर, राजस्थान येथे.
पन्नालालजींनी कथा, कादंबरी, कविता, नाटक, आत्मचरित्र अशा विविध साहित्य प्रकारांत विपुल लेखन केले आहे. रामायण, महाभारत व पुराणे यावर आधारित साहित्यामध्येही त्यांनी विपुल लेखन केले आहे.
५०-६० कुटुंब असलेल्या मांडलीसारख्या लहान गावात त्यांचे बालपण गेले. या खेडय़ात ना वीज, ना शिक्षणाची सोय, ना टपाल सेवेची व्यवस्था. या गावात पोस्टमन येतच नव्हता. कारण कुणालाही पत्र येत नसे. सर्व खेडूत निरक्षर. अशा या वातावरणाचा प्रभाव त्यांच्या लेखनावर पडणे स्वाभाविक होते. पुढे ते अहमदाबाद, मुंबईमध्ये आले. पण सुरुवातीचे हे संस्कार त्यांच्या साहित्यात दिसतातच. उजाड व दुर्लक्षित खेडूत जीवनाचा आरसा असणारे व दुसऱ्या बाजूने रामायण, महाभारतासारख्या वाङ्मयातील मूल्याची थोरवी दाखविणारे साहित्य अशा फार मोठय़ा जीवनपटाचे चित्रण त्यांच्या लेखनात दिसते. ग्रामीण लोकांच्या अज्ञानावर व त्यांच्या दारुण दारिद्रय़ावर आधारित ‘नॅशनल सेव्हिंग्ज’, ‘लख चोरासी’, ‘बापूशो कुतरो’, ‘गवतो’ या त्यांच्या कथा गुजराती साहित्यातील उत्तम प्रतीच्या लघुकथा गणल्या जातात. ‘सुखदु:खना साभी’, ‘तटना राग’ ‘तिलोत्तमा’ हे त्यांचे काही प्रसिद्ध कथासंग्रह ‘वैतरजने काठे’, ‘ढोलीया सा, सीसमनी’ ही त्यांची गाजलेली नाटके आहेत. ‘भांग्याना भैरू’, ‘मानवीनी भवाई’, न घुटके’, ‘यौवन’, ‘सुरभि’, ‘कंकु’, ‘फकिरा’ या त्यांच्या काही कादंबऱ्या प्रसिद्ध असून वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी ‘दुर्गापुराण कथा’ लिहून पूर्ण केली. हे विशेष. एवढय़ासाठी की शेवटी त्यांना प्रकृतीची साथ नव्हती. पोटाच्या विकाराने, क्षयाने ते त्रस्त होते. बहिरेपण आले होते. दृष्टी मंद झाली होती पण लेखनाची ऊर्मी तरुण होती. मनाला जे भावले ते सच्चेपणाने लेखणीद्वारे त्यांनी मांडले.
१९४१ मध्ये त्यांची ‘मळेला जीव’ही कादंबरी प्रसिद्ध झाली आणि अफाट गाजली. ही त्यांची एक उत्तम कादंबरी आहे. काजजीव व जीवी या खेडवळ प्रेमिकांची जात वेगळी असल्याने ते लग्न करू शकत नाहीत, अशा या निष्फळ प्रेमाची ही कथा आहे. या कादंबरीचे अन्य भारतीय भाषांत अनुवाद झाले असून, त्यावर निघालेला चित्रपटही लोकप्रिय झाला. ‘पाछले दरवाजे’चे कथानक वेगळेच आहे. ही एक मातृहृदयाची गाथा आहे. आपल्या मुलाला राज्याच्या हितासाठी दत्तक देणाऱ्या कुँवरबाईच्या मन:स्थितीचे चित्रण करणारी ही कादंबरी आहे. दत्तकविधानामुळे परका झालेला पुत्र, त्याला वस्तुस्थितीची जाणीव झाल्यावर, आईच्या तिरडीला खांदा देण्यासाठी मागच्या दाराने घरात प्रवेश करतो. बदलणारी सामाजिक, राजकीय विचारधारा मांडणारी ही एक महत्त्वपूर्ण कादंबरी आहे.अशिक्षित म्हणविणाऱ्या पन्नालालांचे साहित्य आजही वाचकप्रिय आहे. त्यांनी इतर भाषांतील साहित्य बिल्कूल वाचलेले नव्हते. कित्येक वर्षे १२-१३ तास मोलमजुरी केल्याने त्यांच्या हाताला घट्टे पडले होते. पण त्याच हातांनी लेखन करून ग्रामीण जीवनाला, त्यांच्या वेदनेला त्यांनी शब्दरूप दिले. आपल्या मातीशी नाते सांगणाऱ्या लोकभाषेमुळे त्यांची अभिव्यक्ती वाचकांच्या मनाला जाऊन भिडली आहे. सुमारे चारशेहून अधिक कथांचे २५ संग्रह, ३२ कादंबऱ्या, ५ नाटके, आठवणी, बालसाहित्य यांसारखी विपुल साहित्यनिर्मिती त्यांनी केली. जनसत्ता ह्या दैनिकातून ते एक उपरोधपर सदर लिहीत असत. १९५० मध्ये त्यांना गुजराती साहित्याचा सर्वोच्च असा रणजीतराम सुवर्णचंद्रक मिळाला तसेच १९८५ मध्ये त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार ही मिळाला होता .
गुजराथी कथा-कादंबरीकार पन्नालाल पटेल यांच्या चारशेहून अधिक कथांचे २५ संग्रह, ३२ कादंबर्या, ५ नाटके, बालसाहित्य यासारखी विपुल साहित्यसंपदा त्यांच्या नावावर आहे. पन्नालाल पटेल यांचे ६ एप्रिल १९८९ रोजी निधन झाले.