मुंबई: राज्यामध्ये येत्या काही दिवसांत आंबेडकर जयंती, महावीर जयंती, गुड फ्रायडे, हनुमान जयंती, इस्टर संडे, रमझान ईद असे विविध धर्मियांचे सण साजरे होणार आहेत. हे सण शांततेत पार पडावेत, यासाठी राज्यभर दोन लाख पोलीस व ३८ हजार होमगार्ड यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पोलीस आणि होमगार्डबरोबरच राज्य राखीव पोलीस दलाच्या १०० कंपन्या विविध संवेदनशील आणि महत्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत.

त्याचप्रमाणे आगामी साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांच्या कालावधीमध्ये सराईत व अभिलेखावरील गुन्हेगार, जातीय सलोखा बिघडवणाऱ्या उपद्रवी व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.

सर्व पोलीस घटकांमधील कार्यरत मोहल्ला कमिटी, शांतता कमिटी व संबंधित मंडळाचे सदस्य यांच्या बैठका आयोजित करून त्याद्वारे परिसरातील नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही अफवांना, समाज माध्यमांद्वारे प्रसिध्द केलेल्या पोस्टला बळी पडून धार्मिक तेढ वाढणार नाही याची खबरदारी घ्यावी.

तसेच अशा धार्मिक भावना भडकाविणाऱ्या व्यक्तींची माहिती तात्काळ पोलीसांना देण्याच्या सूचना नागरिकांना करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीमध्ये पोलिसांचे पथ संचालन आयोजित करण्यात आलेले आहेत.