जन्म. २५ एप्रिल १९६४
ट्रकचालक पुढे तीस वर्ष एस.टी.मध्ये बस चालक अशी सेवा बजावताना गाडी चालवता चालवता गाण्याची चाल पकडली. स्टेअरिंगवरचे हात ऑर्गन आणि तबल्यावर थिरकू लागले. एस.टी.मध्ये रात्रपाळी करत दिवसा गायनाकडे लक्ष देत एक गायक म्हणून ओळख निर्माण केलीय चिपळूणच्या राजाभाऊ शेंबेकर यांनी. अंगातील कला कधीच मरत नाही याचे मुर्तीमंत उदाहरण गायक राजाभाऊ शेंबेकर.
राजाभाऊ शेंबेकर यांना गायनाचा वारसा घरातूनच मिळाला. राजाभाऊ यांचे वडील श्रीराम शेंबेकर यांना गायनाची आवड होती आणि काका जयंत शेंबेकर हे जयपूर गायकी शिकले होते. राजाभाऊंचा स्वच्छंदी स्वभाव असल्यामुळे त्यांनी ड्रायव्हरचा पेशा निवडला. सुरुवातीला ट्रकवर आणि त्यानंतर १९८४ पासून एस.टी.त चालक पदावर रजू झाले. वाहन चालविण्याचे कष्ट आणि मेहनतीचे काम करताना त्यांनी गायनाची आवड सोडली नाही. एस.टी.मध्ये दापोली, खेड आणि चिपळूण आगारात त्यांनी तीस वर्ष चालक म्हणून काम करताना रात्रपाळी केली. दिवसा गाणं शिकता यावे, रियाज करता यावा याकरीता मुंबई गाडीवर त्यांनी कायम रात्रपाळी केली. रात्रभर गाडी चालविल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंबईत थोडा वेळ विश्रांती घेऊन त्यानंतर आपल्या ओळखीच्या गायक मंडळीना भेटायचे. त्यांच्याकडून गाण्यातील बारकावे जाणून घ्यायचे असा त्यांचा दिनक्रम होता. चिपळूणात नामवंत गायक राम मराठे कार्यक्रमासाठी येत. त्यावेळी स्वयंसेवकाच्या भूमिकेत राजाभाऊ खुर्च्या लावणे, पेटी उचलणे हि कामे करत असत. अशा कार्यक्रमातूनच राम मराठे यांच्यासह अन्य गायक मंडळींची ओळख वाढली. खरतर एकलव्याप्रमाणे गाणी ऐकत पहात ते गाणं शिकले. किर्तनकार दत्तदास घागबुवा यांच्या कार्यक्रमातून राजाभाऊनी सुरुवातीला ऑर्गन आणि त्यानंतर तबला साथ केली. दत्तदास घागबुवा यानीच राजाभाऊ यांना गायक अशी ओळख महाराष्ट्रात निर्माण करून दिली. घागबुवा त्यांच्या दौऱ्यात राजाभाऊ शेंबेकर यांचेही कार्यक्रम घेत असत. त्यानंतर राजाभाऊ यांनी अप्पासाहेब देशपांडे, लालजी देसाई, गोविंद पटवर्धन, चिंतामणी रहाटे, कविता गाडगीळ, वंदना कट्टी, दरशथबुवा मयेकर, पर्शुराम पांचाळ, विश्वनाथ बागुल, रंजना जोशी, श्रुती सडोलीकर यांच्यासोबत गायनाच्या मैफीली केल्या. चारुदत्त आफळेना साथसंगत केली. राजाभाऊना पंडीत तुळशीदास बोरकर, पंडीत विश्वनाथ कान्हेरे यासारख्या नामवंतानी साथसंगत केली आहे.
गायनाच्या मैफीली रंगवताना राजाभाऊ यांना पंडीत जितेंद्र अभिषेकी यांचही मार्गदर्शन मिळाले. पंडीत जितेंद्र अभिषेकींचे मार्गदर्शन त्यांच्या आयुष्यात बहुमूल्य ठरले. आता पर्यंत राजाभाऊ यांनी साडेसातशे पेक्षा अधिक मैफीली केल्या आहेत. २०१४ मध्ये ते चिपळूण आगारातच चालकपदावरून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर आता त्यांची गायनाची गाडी मात्र वेगात सुरु आहे.
एस.टी.त चालकाची नोकरी असली तरी राजाभाऊनी आपली कला जोपासताना कार्यक्रमासाठी बिनपगारी रजा घ्यायला सुरुवात केली. कार्यक्रमाला जाताना एस.टी.चा कर्मचारी म्हणून आपण कधीच फुकट प्रवास केला नाही, असे सांगताना राजाभाऊनी एक किस्सा सांगितला होता. एकदा कार्यक्रमाच्या ठिकाणी तत्कालीन आमदार अप्पा गोगटे राजाभाऊना म्हणाले की, तुम्ही काय एस.टी.चे जावई, तुम्हाला प्रवास फुकट त्यावर राजाभाऊनी खिशातले एस.टी.चे तिकीट आमदार गोगटेना काढून दाखवले होते.