जन्म. २८ एप्रिल १९६८
झिम्बाब्वेच्या इतिहासातला सर्वांत यशस्वी खेळाडू असलेला अँडी फ्लॉवर हे उत्तम यष्टिरक्षक आणि त्याहीपेक्षा उत्तम फलंदाज होते. झिम्बाब्वेच्या संघाकडून अँडी व ग्रांट फ्लॉवर हे दोघे भाऊ खेळत असत. अँडी आणि ग्रँट फ्लावर ही भावांची जोडी अनेक वर्षं झिम्बाब्वे क्रिकेटची ओळख होती. झिम्बाब्वेवर ब्रिटिश वसाहतवाद्यांची सत्ता असल्याने या देशाच्या क्रिकेट संघात १९९५ पर्यंत सर्व खेळाडू गौरवर्णीयच असत. अँडी फ्लॉवर यांनी ६३ सामन्यांत ५१.५४च्या सरासरीने ४७९४ धावा केल्या. त्यांची भारताविरुद्धची नाबाद २३२ धावांची खेळी ही कसोटी क्रिकेटमध्ये यष्टिरक्षकाने केलेली सर्वाधिक ठरली. १९९६ च्या विश्वचषकात अँडी फ्लॉवर यांच्याकडे नेतृत्व देण्यात आले होते. या विश्वचषकात झिम्बाब्वेने फक्त केनियावर विजय मिळवला होता. २००३ च्या विश्वचषका दरम्यान रॉबर्ट मुगाबे यांच्या राजवटीमुळे झिम्बाब्वेत राजकीय अस्थिरता निर्माण होऊन मोर्चे, जाळपोळ असे बंडाचे वातावरण सुरू होते. त्यामुळे इंग्लंड, न्यूझीलंड संघांनी झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यांतून माघार घेतली. झिम्बाब्वेच्या अँडी फ्लॉवर आणि हेन्री ओलोंगा यांनीसुद्धा संपूर्ण विश्वचषकादरम्यान मुगाबेच्या साम्राज्याचा विरोध करत दंडावर काळी फीत बांधली आणि त्या विश्वचषकानंतर अँडी फ्लॉवर यांनी निवृत्तीसुद्धा पत्करली. या विश्वचषकानंतर दक्षिण आफ्रिकेतून अँडी फ्लॉवर थेट इंग्लंडलाच रवाना झाले. त्यांना इंग्लंडमध्ये निर्वासित म्हणून आसरा मिळाला. अँडी फ्लॉवर यांनी सर्व पूर्वतयारी केलेली असल्याने त्याच्याकडे इंग्लंडमधील क्लब क्रिकेटचे कॉन्ट्रॅक्ट होते. त्याच्या पुढील वर्षी २००४ मध्ये अँडी यांचा भाऊ ग्रँट यानेही देश सोडला व तोही इंग्लंडमध्येच गेला.अँडी फ्लॉवर हे बारा वर्षे इंग्लंडचे प्रशिक्षक राहिले आहेत. सध्या अँडी फ्लॉवर इंग्लंडमध्ये राहतात.




















