जन्म. ३ ऑगस्ट १९१६
‘शकील’ शब्दाचा अर्थच आहे, ‘हॅन्डसम’, रुबाबदार. शकील बदायूँनी तसेच होते आणि त्यांचे कपडेही त्या शब्दाला साजेसे असत. कधीही चकचकीत बूट व टायची गाठ बांधल्याशिवाय ते घराबाहेर पडत नसत.
वडील जमाल अहमद सोख्ता ‘काद्री’ हे शायर आणि काका जिया उल काद्री हे तर दाग-मोमीनच्या काळातले समीक्षक. नुसते समीक्षक नव्हे, तर ‘नातगो’ शायर. (‘नात’ म्हणजे हजरत महंमद यांचे प्रशंसागीत.ते लिहिणारा कवी). वडिलांनी या ‘नन्ना मुन्ना राही’ शकीलला अरबी, फार्सी, ऊदरू, हिंदी सगळ्या भाषा शिकण्यासाठी मौलवी अब्दुल गफार, मौलवी अब्दुल रहमान, बाबू रामचंद्र या त्यावेळच्या ज्ञानवंतांना पाचारण केले होते. त्यातूनच पुढे शकील ज्या अलीगढ विद्यापीठात गेले, तेथे अहसन मारहरवीसारखे प्राध्यापक शिकवायला आणि मजाजसारखे सहाध्यायी होते. शायरीचे काही धडे त्यांनी प्रथम काकांकडे, नंतर जिगर मुरादाबादींकडे गिरविले. काळाप्रमाणे राग बदलावा, हे शकील यांना चांगलेच समजत होते. कॉलेजमध्ये असतानाच ते कविसंमेलनात गाजत होते. रुबाबदार शकीलजींना गळाही तितकाच गोड लाभला होता. एका कविसंमेलनात दस्तूरखुद्द नौशाद उपस्थित होते. त्यांनी मुंबईचे निमंत्रण दिले आणि ‘झुले मे पवन के आई बहार’ असेच झाले. शकील अहमदचे नाव भारतात चित्रपटाद्वारे ‘शकील बदायूँनी’ म्हणून झगमगू लागले. ‘दर्द’ हा त्यांचा पहिला चित्रपट आणि त्यांनी लिहिलेले ‘अफसाना लिख रही हूँ’ गाणाऱ्या उमादेवी ऊर्फ टुणटुणचाही पहिलाच चित्रपट होता. शकील यांचा चित्रपटसृष्टीतील एक विक्रम आजही तसाच आहे. तो म्हणजे सलग तीन वर्षे (१९६१ ते ६३) फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाला आहे. शकील बदायूँनी यांचे २० एप्रिल १९७० रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे शकील बदायूँनी यांना आदरांजली.