जन्म.१३ एप्रिल १९५६ हरियाणाच्या महेन्द्र गढ येथे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेलं नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेता व दिग्दर्शक सतीश कौशिक. अनेक लोकप्रिय चित्रपटाचं दिग्दर्शन केलेल्या सतीश कौशिक यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:चा एक स्वतंत्र ठसा उमटविला आहे. त्यांनी ‘तेरे नाम’, ‘हम आप के दिल में रहेते है’, ‘हमारा दिल आपके पास है’, ‘
बधाई हो बधाई ’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. सतीश कौशिक यांनी आजवर आपल्या विनोदी भूमिकेतून तमाम भारतवासीयांच्या मनात घर केले. कधी ते पप्पू पेजर झाले, कधी कॅलेंडर, कधी जर्मन तर कधी कुंजबिहारी म्हणून त्यांनी प्रेक्षकांना हसवले. दिल्लीच्या किरोडीमल कॉलेज मध्ये त्यांनी आपले महविद्यालयीन शिक्षण पुरे केले. सतीश कौशिक यांनी एनएसडीमधून शिक्षण पूर्ण केल्यांनतर पुण्याच्या पुणे फिल्म इंस्टीट्यूट मध्ये शिक्षण घेतले व पुढे त्यांनी मुंबईची वाट धरली. विशेष म्हणजे चाळीस वर्षांपूर्वी मुंबईला जाणे म्हणजे ‘परदेशवारी’हून कमी नव्हते. अशा परिस्थितीत केवळ आठशे रुपये घेऊन त्यांनी मुंबईत प्रवेश केला. जे मिळेल ते काम करायचे, असा त्यांनी निश्चय केला होता. त्यामुळे त्यांना काम मिळत गेले आणि मी करत गेलो, मुंबईत आल्यावर आठव्याच दिवशी पृथ्वी थिएटरला नाटकात अभिनेता म्हणून संधी मिळाली. पुढे उपजीविकेसाठी त्यांनी नोकरीही केली, ‘मासूम’ चित्रपटासाठी त्यांना शेखर कपूर यांच्या तालमीत सहाय्यक दिग्दर्शनाची संधी मिळाली. त्यांनी या सिनेमात अभिनयसुध्दा केला होता. सहाय्यक दिग्दर्शकापासून त्यांची बढती दिग्दर्शक पदावर झाली आणि ‘रूप की रानी चोरों का राजा’ हा त्यांचा पहिला चित्रपट १९९३ला प्रदर्शित झाला. ‘राम-लखन’ (१९८९) आणि ‘साजन चले ससुराल’ (१९९६) सिनेमासाठी सतीश यांना दोनवेळा सर्वोत्कृष्ट विनोदवीर फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. ‘सूरमा’, ‘वीरे दी वेडिंग’, ‘यमला पगला दीवाना 3′,’मैं जिंदा हूं’, ‘नमस्ते इंग्लँड’ यासारख्या सिनेमांमध्ये सतीश कौशिक यांनी काम केले आहे. अनेक सिनेमांत अभिनय केलेल्या सतीश यांना फनी डायलॉग्ससाठी ओळखले जाते. सतीश कौशिक यांनी १०० हून अधिक चित्रपटात अभिनय केला आहे. अभिनेत्याशिवाय ते दिग्दर्शक-निर्मातेसुध्दा आहेत. २०१४ मध्ये सतीश कौशिक यांनी ‘गँग ऑफ घोस्ट्स’ सिनेमा दिग्दर्शित केला होता. बॉलिवूडमध्ये यश मिळवल्यानंतर सतीश कौशिक यांनी मराठी चित्रपटसृष्टीत ‘मन उधाण वारा’ हा चित्रपट निर्माण केला आहे. सतीश कौशिक ‘तेरे नाम’ चित्रपटाचा सिक्वल बनवण्याचा विचार करत आहेत.