जिममध्ये अतिव्यायाम करणं बेतलं जीवावर; पुण्यात २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू

0
169

जिममध्ये व्यायाम करत असताना अवघ्या २३ वर्षीय तरुणाचा बेशुद्ध पडून मृत्यू झाल्याची घटना पिंपरी-चिंचवड शहरामध्ये घडली आहे. अनमोल गोजे वय- २३ असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सध्या उन्हाळा असून जास्त व्यायाम आणि जास्त वजन उचलणे जीवावर बेतू शकतं अस अनमोलच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनमोल हा पुनावळे येथील एका फिटनेस क्लबमध्ये दररोज व्यायाम करायचा. दरम्यान, मंगळवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास तो जिममध्ये व्यायाम करत असताना चक्कर येऊन बेशुद्ध पडला. जिममधील इतर सहकाऱ्यांनी अनमोलला तातडीने पुनावळे येथील खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले अशी माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिली आहे.

“व्यायाम करत असताना जास्त वजन उचलणे किंवा जास्त व्यायाम करणे जीवावर बेतू शकतं. सध्या उन्हाळा असल्याने डिहायड्रेशन होऊन देखील अशी घटना घडू शकते. प्रोटीन पावडर घेत असताना डॉक्टरांच्या किंवा जिम ट्रेनरच्या सल्ल्यानुसार घ्यावं. १६ ते ३५ या वयोगटात अशा घटना घडू शकतात. सध्या फिटनेस महत्वाचं म्हणून उठसूठ व्यायाम करत आहेत. त्यामुळं कमी आणि नियोजित व्यायाम करावा”, असा सल्ला पिंपरीतल्या वायसीएम रुग्णालयातले डॉ. विनायक पाटील यांनी दिला आहे.