८९ टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे ; आठव्या जनुकीय चाचणीचे निष्कर्ष जाहीर

0
40

मुंबई : 

करोना विषाणूच्या नवीन प्रकाराचा किती प्रसार झाला याची पडताळणी करण्यासाठी केलेल्या आठव्या चाचणीचे निष्कर्ष पालिकेच्या आरोग्य विभागाने जाहीर केले आहेत. या आठव्या फेरीतील चाचण्यांसाठी ३७३ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २८० नमुने मुंबई महापालिका क्षेत्रातील होते, तर उर्वरित नमुने मुंबई मनपा क्षेत्राबाहेरील होते. मुंबईतील २८० नमुन्यांपैकी ८९ टक्के अर्थात २४८ नमुने हे ‘ओमायक्रॉन’ या उपप्रकाराने बाधित असल्याचे निदर्शनास आले. ८ टक्के अर्थात २१ नमुने हे ‘डेल्टा डेरिव्हेटिव्ह’ या उपप्रकाराने, तर उर्वरित सुमारे सुमारे ३ टक्के अर्थात ११ नमुने हे इतर उपप्रकारांचे असल्याचे आढळून आले आहे.

‘करोना १९’ विषाणूच्या जनुकीय सूत्रांचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेंसिंग) हे ऑगस्ट २०२१ पासून नियमितपणे व फेरीनिहाय करण्यात येत आहे. या अंतर्गत आठव्या फेरीदरम्यान करण्यात आलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष नुकतेच हाती आले.

करोना विषाणुंचे जनुकीय सूत्र निर्धारण केल्यामुळे एकाच विषाणूच्या दोन किंवा अधिक प्रजातींमधील फरक ओळखू येतो. ज्यामुळे या अनुषंगाने उपचार करण्याची नेमकी दिशा निश्चित करणे सुलभ होते. परिणामी, ज्या रुग्णांना करोनाची बाधा झाली आहे, त्यांच्यावर अधिक परिणामकारक उपचार करणेही शक्य होते.

२८० चाचण्यांचे वयोगटानुसार विश्लेषण

२८० रुग्णांपैकी ३४ टक्के अर्थात ९६ रुग्ण हे २१ ते ४० या वयोगटांतील आहेत. या खालोखाल २८ टक्के  म्हणजेच ७९ रुग्ण हे ४१ ते ६० या वयोगटातील आहेत.२५ टक्के म्हणजेच ६९ रुग्ण हे ६१ ते ८० या वयोगटांतील आहेत. ८ टक्के म्हणजेच २२ रुग्ण हे ० ते २०ह्ण या वयोगटांतील; तर ५ टक्के म्हणजे १४ रुग्ण हे ८१ ते १०० या वयोगटांतील आहेत. चाचण्या करण्यात आलेल्या २८० नमुन्यांमध्ये ० ते १८ या वयोगटांतील १३ नमुन्यांचा समावेश होता. ज्यापैकी, २ नमुने ० ते ५ वर्षे या वयोगटांतील, ४ नमुने ६ ते १२ वर्षे या वयोगटांतील; तर ७ नमुने १३ ते १८ वर्षे या वयोगटांतील होते. हे सर्व नमुने ‘ओमायक्रॉन’ या करोना विषाणुच्या उपप्रकाराने बाधित असल्याचे आढळून आले. मात्र या रुग्णांना करोनाची कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आली नाहीत.

दोन्ही मात्रा घेतलेले ८९ रुग्ण रुग्णालयात 

२८० पैकी सात रुग्णांनी लशीची केवळ पहिली मात्रा घेतलेली होती. यापैकी सहा रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले; तर दोन रुग्णांना अतिदक्षता कक्षात दाखल करावे लागले. लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या १७४ रुग्णांपैकी ८९ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यापैकी दोन रुग्णांना प्राणवायूची गरज भासली, तर १५ रुग्णांना

अतिदक्षात विभागात दाखल करावे लागले. एकूण रुग्णांपैकी ९९ रुग्णांनी करोना प्रतिबंधात्मक लशीची एकही मात्रा घेतलेली नव्हती. यापैकी ७६ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तर १२ रुग्णांना प्राणवायूची गरज भासली आणि पाच रुग्णांना अतिदक्षता कक्षात दाखल करावे लागले.

राज्य : २८,२८६ नवे रुग्ण

मुंबई : राज्यात करोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून दिवसभरात करोनाच्या २८,२८६ नवीन रुग्णांची नोंद झाली आणि ३६ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात २१,९४१ रुग्ण करोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या २,९९,६०४ झाली आहे.  दिवसभरात ओमायक्रॉनचे ८६ रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णसंख्या २८४५ झाली आहे.

रुग्णसंख्येत मोठी घट

मुंबई : मुंबईत तिसरी लाट ओसरायला लागली असून गेल्या तीन दिवसांत रुग्णसंख्येत कमालीची घट दिसून आली. मुंबईत सोमवारी १,८५७ नवे करोना रुग्ण आढळले, तर ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय ५०३ रुग्ण करोनामुक्त झाले. शहरात सध्या २१,१४२ रुग्ण उपचाराधीन आहेत. शहरातील सोमवारी ११ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यातील नऊ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. .

ठाणे जिल्हा : १,७४५ नवे बाधित

ठाणे जिल्ह्यात सोमवारी १ हजार ७४५ रुग्ण आढळून आले. तर, करोनामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत ६९०, ठाणे ३९९, कल्याण-डोंबिवली २५९, मिरा- भाईंदर १०६, ठाणे ग्रामीण ९६, उल्हासनगर ८७, अंबरनाथ ४८, बदलापूर ३६ आणि भिवंडीत २४ रुग्ण आढळून आले.