१४ जानेवारी कथाकार आणि कादंबरीकार राजेंद्र बनहट्टी यांचा वाढदिवस.

0
14
जन्म.१४ जानेवारी १९३८
राजेंद्र बनहट्टी हे मराठीतील अव्वल दर्जाचे कथालेखक आणि कादंबरीकार म्हणून सुपरिचित आहेत. बनहट्टी यांचे अकरा कथासंग्रह विशेष गाजले. त्यांच्या त्रैराशिक या कादंबरीला महाराष्ट्र शासनाने हरी नारायण आपटे सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार देऊन गौरवले आहे. ही कादंबरी मानवी भावभावना, नातेसंबंध आणि स्वभावाचे कंगोरे उलगडत जाते.
जगण्याची चिवट इच्छा असलेल्या आणि आयुष्यातल्या सर्व प्रकारच्या रसांचा मनापासून आनंद घेणाऱ्या एका उच्च मध्यमवर्गीय नव्वदीतल्या म्हाताऱ्याची अफलातून कथा मांडलेली त्यांची ‘अखेरचे आत्मचरित्र’ ही कादंबरी चांगलीच गाजली आणि वाचकप्रिय ठरली होती.
त्रैराशिक, समानधर्मा, खेळ, आंब्याची सावली, युद्धपर्व, कृष्णजन्म, तिघी, जीवन त्यांना कळले हो!, माणूस म्हणतो माजे घर गोष्टी घराकडील अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. आपल्या खास लेखनशैलीने बनहट्टी वाचकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी होतात.
पुण्यामध्ये २००२ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.