१४ जानेवारी संवेदनशील कवी सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ कैफी आझमी यांचा जन्मदिवस

0
16
जन्म. १४ जानेवारी १९१९ आझमगड जिल्ह्यातील मिजवां येथे.
उत्तर प्रदेशातील आझमगढ जिल्ह्यात एका जमीनदाराच्या घरी कैफी आझमी यांचा जन्म झाला. नातेवाईकांच्या हट्टामुळे धार्मिक शिक्षणासाठी लखनौच्या सुलतान-अल-मदरिस मध्ये दाखल व्हावे लागलेल्या कैफी यांना त्याच्या बंडखोर स्वभावामुळे तिथून हाकलून देण्यात आले. ते अत्यंत संवेदनशील होते. लहानपणापासूनच जो माणूस अलम दुनियेतील दु:खे संपवणा-यांच्या गटात सामील झाला, सर्वांच्या दु:खाला आपल्या गीतांमधून ज्याने शक्ती दिली आणि न्यायाच्या लढाईत ज्याची गाणी पुढच्या रांगेत असत, तो स्वत:चे दु:ख कधीही व्यक्त करीत नसे. कैफी आझमी फार मोठे कवी होते. आपल्या भावाची गझल पूर्ण करण्यासाठी त्यांनी १२ व्या वर्षी जी गझल लिहिली ती अमर झाली. नंतर तीच गझल बेगम अख्तर यांनी गायिली. ‘इतना तो जिंदगी में किसी की खलल पडे, हंसने से हो सुकून न रोने से कल पडे’.
कैफी आझमी यांचे नशीब म्हणजे त्यांना मित्र फारच चांगले मिळाले. मुंबईत इप्टाच्या दिवसांतील त्यांचे मित्र नंतर नावाजलेले कलावंत म्हणून ओळखले जाऊ लागले. इप्टामध्येच होमी भाभा, किशन चंदर, मजरूह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, बलराज साहनी, मोहन सहगल, मुल्कराज आनंद, रोमेश थापर, शैलेंद्र, प्रेम धवन, इस्मत चुगताई, ए. के. हंगल, हेमंतकुमार, अदी मर्झबान, सलिल चौधरींसारख्या कम्युनिस्टांसोबत त्यांनी काम केले. ते एकदा असेच हैदराबादला गेले असताना ‘यूँही कोई मिल गया था चलते चलते’ असे काहीसे त्यांच्या बाबतीत घडले. ज्या मुलीच्या प्रेमात ते पडले होते ती मुलगी म्हणजेच उदारमतवादी याह्या खान यांची कन्या शौकत. शौकत यांनी कैफींना पसंत करण्याचे कारण म्हणजे कैफी विख्यात शायर होते. प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनचे संस्थापक सज्जाद जहीर यांच्या ड्रॉइंग रूममध्ये त्यांचे लग्न लागले होते. १९४६ मध्ये क्रांतिकारी विचारसरणीच्या शौकत यांनी आईच्या मर्जीविरुद्ध आपल्या पुरोगामी वडिलांसोबत औरंगाबादहून मुंबईला येऊन कैफी यांच्याशी लग्न केले होते. त्यांच्या निकाहच्या वेळी काझीने शौकतजींना विचारले, ‘‘तुला हे लग्न कबूल आहे?’’ तिने ‘हो’ म्हटले. पण पंचाईत पुढे आली. मुलगा शिया अन् मुलगी सुन्नी पंथाचा. असे लग्न असेल, तर तिथे दोन्ही काझी आवश्यक असतात. त्याकाळी ते परिस्थितीने गरीब होते. त्यांनी कसाबसा एक काझी आणला होता. दुसर्या् काझीला द्यायला पैसे नव्हते. तेव्हा काझीने मुलाचा धर्म विचारताच मित्राने सांगितले, ‘‘मुलगा हनफियुल (म्हणजे इमाम अबू हनाफी यांचे जे अनुयायी आहेत, त्यांच्या पंथाचा) आहे.’’ या युक्तीवादाच्या जोरावर लग्न पार पडले. लग्नानंतर कैफींनी ब-याच खस्ता खाल्ल्या. ते गावी गेले. तिथे त्यांच्या मुलाचा जन्म झाला. त्यांचा पहिला मुलगा ‘खय्याम’ एक वर्षाचा होऊन वारला. नंतर ते मुंबईला गेले. सुरुवातीलाही ते लखनऊला राहिले होते. धार्मिक शिक्षण घेण्यासाठी ते गेले होते; पण न्यायासाठी लढा सुरू केल्याने त्यांना हाकलून देण्यात आले. त्यांची मुलगी शबाना पोटात होती तेव्हा कम्युनिस्ट पक्षाने आदेश दिला की, गर्भपात करा. कैफी भूमिगत होते आणि पक्षाला मुलाबाळांच्या खर्चाची चिंता होती. शौकत कैफी आपल्या आईकडे हैदराबादला गेल्या. तेथेच मुलगी शबाना आझमी यांचा जन्म झाला. नंतर त्यांना एक मुलगा झाला त्याचे नाव अहमद ऊर्फ बाबा. शबाना आझमी यांच्या यशात कैफींचा फार मोठा वाटा आहे.
विसाव्या शतकातील अनेक उत्कृष्ट चित्रपट कैफींच्या नावाने ओळखले जातात. ‘हीर रांझा’मध्ये चेतन आनंदने सर्व संवाद कवितेच्या रूपात सादर करण्याची इच्छा व्यक्त केली आणि कैफी यांनी ते संवाद लिहिले. प्रियाऐवजी कुणी दुसरी नायिका असती तर राजकुमारला हा चित्रपट कुठवर घेऊन गेला असता सांगता येत नाही. सर्वोत्कृष्ट युद्धपट ‘हकीकत’ हाही कैफींचा चित्रपट. ‘गर्म हवा’, ‘कागज के फूल’, ‘मंथन’, ‘कोहरा’, ‘सात हिंदुस्तानी’, ‘बावर्ची’, ‘पाकीजा’, ‘हंसते जख्म’, ‘अर्थ’, ‘रजिया सुलतान’, असे चित्रपट कैफींमुळे अजरामर झाले. कैफी यांनी जास्ती गाणी लिहीली नाहीत पण जी लिहीली ती काळजाचा ठाव घेणारी ठरली. त्यातला अर्थपूर्ण आशय रसिकांच्या मनाला अलगद स्पर्श करणारा होता. ‘चलते-चलते यूँ ही कोई मिल गया था’ (पाकिजा), ‘वक्त ने किया क्या हसीं सितम’ (कागज के फूल), ‘तुम बिन जीवन कैसा जीवन'(बावर्ची), ‘तुम जो मिल गए हो तो ये लगता है…’ (हंसते जख्म), ‘कुछ दिल ने कहा, कुछ भी नहीं’ (अनुपमा), ‘इक जुर्म करके हमने चाहा था मुस्कुराना’ (शमा), ‘जीत ही लेंगे बाजी हम तुम’ (शोला और शबनम), ‘ये नयन डरे डरे’ (कोहरा), ‘सारा मोरा कजरा चुराया तूने'(दो दिल), ‘बहारों…मेरा जीवन भी सँवारो'(आखिरी खत), ‘धीरे-धीरे मचल ए दिल-ए-बेकरार’ (अनुपमा), ‘या दिल की सुनो दुनिया वालों’ (अनुपमा), ‘मिलो न तुम तो हम घबराए’ (हीर-रांझा), ‘ये दुनिया ये महफिल’ (हीर-रांझा), ‘जरा सी आहट होती है तो दिल पूछता है’ (हकीकत) ही त्यांची काही लोकप्रिय चित्रपट गीते होत… १९८० च्या दशकात कैफी आझमींनी ‘अर्थ’ चित्रपटासाठी अतिशय आशयसंपन्न गीते लिहिली ‘झुकी झुकी सी नजर करार है की नही, दबा दबा सा सही, दिल में प्यार है की नही’ ‘कोई ये कैसे बतायें की वो तनहा क्यों है’ आणि तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो’. भारत सरकार ने १९७४ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सम्मानित केले होते. *कैफी आझमी* यांचे निधन १० मे २००२ रोजी झाले. आपल्या समूहाकडुन कैफी आझमी यांना आदरांजली. शबाना आझमीने आपले वडील कैफी आझमी यांच्या कवितांना समर्पित एका वेबसाइटची निर्मिती केली आहे.
या वेबसाइटवर कैफी आझमी यांनी लिहिलेली गाणी आणि कविता ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरुपात उपलब्ध आहेत. त्याशिवाय येथे व्हिडिओ, त्यांनी लिहिलेल्या कविता आणि गाण्यांबरोबरच त्यांच्या विषयीची माहितीदेखील पुरविण्यात आली आहे.
‎कैफी आझमी यांच्या जन्मशताब्दीची सांगता निमित्ताने गुगलने डूडल बनवले होते