कोव्हिड : ओमिक्रॉनला सौम्य म्हणू नये, त्यामुळे अनेकांचे मृत्यू – WHO

0
32

ओमिक्रॉनला ‘सौम्य’ व्हेरियंट असल्याचं वर्णन करणाऱ्यांना जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) सतर्कतेचा इशारा दिलाय. जगभरात ओमिक्रॉनमुळे अनेकांचे जीव जातायेत, असं WHO नं म्हटलंय.

कोव्हिडच्या आधीच्या व्हेरियंटच्या तुलनेत ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्ण फार गंभीर आजारी पडत नाही, असं गेल्या काही दिवसातील अभ्यास सांगतात.

मात्र, ओमिक्रॉनमुळे ज्या संख्येत संसर्ग होतोय, त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण पडताना दिसतोय, अशी चिंता WHO चे प्रमुख डॉ. टेड्रॉस घेब्रेयसस यांनी व्यक्त केलीय.

सोमवारी, 3 जानेवारी 2022 रोजी अमेरिकेत 24 तासात दहा लाख कोव्हिड रुग्ण सापडले होते.

गेल्या आठवड्याभरात जगभरात कोव्हिडच्या केसेसमध्ये 71 टक्क्यांनी वाढ झालीय. हीच वाढ अमेरिकेत 100 टक्क्यांच्या घरात आहे. कोव्हिड लागण झाल्यानंतर गंभीर झालेल्या रुग्णांपैकी 90 टक्के जणांनी लस घेतली नव्हती, असंही स्पष्ट झालंय.

“डेल्टा व्हेरियंटच्या तुलनात ओमिक्रॉन व्हेरियंट कमी गंभीर परिणाम दाखवणारा असला, विशेषत: लसीकरण झालेल्यांमध्ये, तरी त्याला ‘सौम्य’ म्हणायला नको,” असं डॉ. टेड्रोस यांनी मंगळवारी, 4 जानेवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं

“आधीच्या व्हेरियंटप्रमाणेच ओमिक्रॉनमुळेही लोकांना रुग्णालयात धाव घ्यावी लागतेय. ओमिक्रॉनही लोकांचे बळी घेतोय. किंबहुना, संसर्गाची लागण एखाद्या त्सुनामीप्रमाणे आहे. जगभरातल्या आरोग्य व्यवस्थांवर प्रचंड ताण आणणाऱ्या या केसेस आहेत,” असंही ते पुढे म्हणाले.

ओमिक्रॉन सर्वाधिक संसर्ग होणारा आणि पूर्ण लसीकरण झालेल्यांनाही लागण होणारा व्हेरियंट आहे. तरीही कोव्हिडविरोधात लढण्यासाठी आणि रुग्णालयात जाण्यापासून वाचण्यासाठी लसच सध्या एकमेव आधार आहे.