कोरोनाचा नवा ‘भयंकर’ अवतार अफ्रिकेत सापडला, जग धास्तावलं

0
42

पुन्हा एकदा काहीशी ओळखीच्याच पण नकोशा अशा विषयावर चर्चा सुरू झाली आहे. कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटबाबत पुन्हा काळजी वाढायला लागली आहे.

कोरोनाचा एक नवा आणि आतापर्यंतचा सर्वाधिक बदल किंवा उत्परिवर्तन (म्युटेशन) झालेला विषाणू आढळला आहे. या विषाणूमध्ये झालेल्या म्युटेशनची यादी एवढी मोठी आहे की, एका शास्त्रज्ञांनी त्याचं वर्णय “भयावह” विषाणू असं केलं आहे. तर दुसऱ्या एका शास्त्रज्ञांनी आतापर्यंतचा कोरोना विषाणूचा हा सर्वांत वाईट प्रकार असल्याचं म्हटलं आहे.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी याबाबत सर्व राज्यांना एक पत्र जारी केलं आहे. तर राज्य कोरोना टास्क फोर्ससुद्धा याबाबत सतर्क झाली आहे.

या विषाणूची प्रकरणं आढळण्याची नुकतीच सुरुवात झाली असून, याची लागण झालेले रुग्ण हे दक्षिण आफ्रिकेतील एकाच प्रांतामध्ये आहेत. मात्र याचा संसर्ग इतरही ठिकाणी झाला असल्याचे संकेतही मिळत आहे.

याबाबतचे सर्वांत महत्त्वाचे मुद्दे म्हणजे, हा नवा विषाणू किती वेगानं पसरतो? त्याची क्षमता आणि लसीपासून मिळालेल्या संरक्षणाला बायपास करण्याची त्याची क्षमता किती आहे? आणि यावर तातडीने काय उपाय करावे? असे प्रश्न लगेचच समोर येतात.

याबाबत अनेक अंदाज व्यक्त केले जात आहेत, पण त्याबाबत अत्यंत मोजकी अशी स्पष्ट माहिती आहे.

नेमकी काय माहिती आहे?

“कोरोनाच्या या नव्या विषाणूला B.1.1.529 असं नाव देण्यात आलं आहे.” ते ग्रीक कोड नावासारखं (अल्फा आणि डेल्टा व्हेरिएंटप्रमाणं) असून शुक्रवारी जागतिक आरोग्य संघटनेनं हे नाव दिलं.

या विषाणूमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे. विषाणूच्या बदलामध्ये अत्यंत असामान्य असे काही घटक आढळून आले आहेत. त्यामुळं इतर व्हेरीएंटच्या तुलनेत हा प्रकार अत्यंत वेगळा आहे, असं दक्षिण आफ्रिकेतील सेंटर फॉर एपिडेमिक रिस्पॉन्स अँड इनोव्हेशनचे संचालक तुलिओ डि ऑलिव्हिरा यांनी म्हटलं.

“या नव्या प्रकारच्या विषाणूनं आम्हाला आश्चर्यचकित केलं. बदलांचा विचार करता यानं मोठी उडी घेतली आहे. आम्हाला अपेक्षा होती, त्यापेक्षा अधिक म्युटेशन झालं आहे,” असं ते म्हणाले.

याबाबत माध्यमांना माहिती देताना ऑलिव्हिरा यांनी म्हटलंय, या नव्या विषाणूत एकूण 50 म्युटेशन आढळलेत. त्यापैकी 30 पेक्षा अधिक स्पाईक प्रोटीनवर आढळलेत. बहुतांश लसींद्वारे या स्पाईक प्रोटिनला लक्ष्य करण्यात आलं आहे. कोरोनाचा विषाणू याच्या माध्यमातून शरिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतो.

यात अधिक खोलवर अभ्यास करून रिसेप्ट बाईंडिंग डोमेनचा (आपल्या शरिरातील पेशींच्या या भागाशी विषाणूचा सर्वप्रथम संपर्क येतो) अभ्यास केला असता यात 10 म्युटेशन आढळले. संपूर्ण जगाला हादरा देणाऱ्या डेल्टा व्हेरिएंटमध्ये या भागात केवळ 2 म्युटेशन झालेले होते.

कोरोनाच्या विषाणूवर मात करण्यात अपयशी ठरलेल्या एकाच रुग्णाच्या शरिरात एवढे म्युटेशन झालेले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

अनेक म्युटेशन हे वाईटच असतात असंही नाही. पण त्याचे परिणाम नेमके काय होतात, हे महत्त्वाचं असतं.

पण आता समोर आलेली चिंतेची बाब म्हणजे हा नवा विषाणू वुहान आणि चीनमध्ये आढळलेल्या मूळ विषाणूच्या तुलनेत प्रचंड वेगळा आहे. म्हणजे, या विषाणूच्या स्ट्रेनचा वापर करून तयार करण्यात आलेल्या लशी फारशा प्रभावी ठरू शकणार नाहीत.

काही म्युटेशन हे आधीच्या इतर काही प्रकारच्या विषाणूंमध्ये आढळलेले आहेत. त्यावरून या विषाणूतील त्यांच्या नेमक्या भूमिकेबाबत माहिती मिळते.

उदाहरण सांगायचं झाल्यास, N501Y यामुळं कोरोना विषाणूचा प्रसार हा आणखी सहजपणे होताना दिसतो. यापैकी काही विषाणूमुळं शरिरातील अँटिबॉडीला नेमका विषाणू ओळखणं कठिण ठरत असल्यानं त्यांचा प्रभाव कमी होतो. पण इतर काही पूर्णपणे नवीनही आहेत.