आज ज्येष्ठ रंगकर्मी आणि चित्रपट अभिनेते डॉ.#मोहन_आगाशे यांचा वाढदिवस.**

0
84
आज ज्येष्ठ रंगकर्मी आणि चित्रपट अभिनेते डॉ.#मोहन_आगाशे यांचा वाढदिवस.**
जन्म. २३ जुलै १९४७
डॉ. मोहन आगाशे हे अभिनेत्यांच्या वनश्रीतला वटवृक्ष, मराठी रंगभूमीवरचे भीष्म पितामह, काटकोन त्रिकोणातला ९० अंशाचा कोन! म्हणून ओळखले जातात.
डॉ.आगाशे सध्या व्यावसायिक रंगभूमीवर फारसे दिसत नसले, तरी त्यांच्या भोवती वलय कायम आहे. ‘घाशीराम कोतवाल’ या मराठी रंगभूमीवरील मैलाचा दगड ठरलेल्या नाटकातील नाना फडणवीसाच्या भूमिकेने हे वलय त्यांच्या भोवती निर्माण केले खरे; परंतु या भूमिकेच्या ही पलीकडे डॉ. आगाशे यांचे कर्तृत्व मोठे आहे. मानसशास्त्र वैद्यकीय शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर प्राध्यापक आणि पुण्यातील ससून रुग्णालयात मानसोपचारतज्ञ म्हणून सेवा देणारे डॉ. मोहन आगाशे यांचा लहानपणापासूनच रंगभूमीकडे ओढा होता. सई परांजपे यांच्या बालनाट्यातून रंगभूमीवर पदार्पण केल्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन पातळीवरही रंगभूमी गाजविली. त्यानंतर राजाभाऊ नातू यांच्या ‘महाराष्ट्रीय कलोपासक संस्थे’तून राज्य नाट्यस्पर्धेत नाटके केली. बी.जे.मेडिकल कॉलेज मध्ये शिकत असताना पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत ‘प्रार्थना’, ‘सरहद्द’ अशा एकांकिका त्यांनी गाजवल्या. ‘सरहद्द’चे दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल होते. जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेल्या पी.डी.ए.च्या ‘अशी पाखरे येती’ या विजय तेंडुलकरांच्या नाटकात डॉ. मोहन आगाशे होते. राज्य नाट्य स्पर्धेतील ‘डाकघर’ या नाटकातून त्यांचे अभिनय कौशल्य सर्वदूर पोहोचले. पुण्यातील प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनच्या ‘धन्य मी कृतार्थ’ आणि ‘अशी पाखरे येती,’ या नाटकांतील त्यांच्या भूमिकांनंतर दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी त्यांना विजय तेंडूलकर यांच्या ‘घाशीराम कोतवाल’ मधील नाना फडणवीसाची भूमिका दिली.
पुढे ‘घाशीराम’ मुळे पी.डी.ए. फुटली आणि थिएटर अकॅडेमी या संस्थेचा जन्म झाला. डॉ. आगाशेंच्या नाना फडणवीसाचा सर्वत्र बोलबाला झाला होताच; पण थिएटर अकॅडेमीने केलेल्या सतीश आळेकरांच्या ‘बेगम बर्वे तल्या शामराव टांगेवाल्याच्या भूमिकेने त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. तब्बल ८०० प्रयोगांपर्यंत पोहचलेले हे नाटक परदेशी रंगभूमीवर नेण्यात डॉ. आगाशे यांचे योगदान मोठे आहे. १९८० साली लंडनमध्ये ‘घाशीराम’चा प्रयोग ब्रिटिशांसमोर सादर झाला. त्यासाठी आगाशे १९७७ सालापासून प्रयत्न करीत होते. त्यांनी पुढे देशोदेशी आपले सांस्कृतिक संबंध तयार केले आणि जगातल्या अनेक देशांत ‘घाशीराम कोतवाल’ पोचवले. थिएटर अकॅडेमीचे आगाशे हे सांस्कृतिक दूतच बनले. सलग वीस वर्षे हे नाटक रंगभूमीवर गाजत राहिले.
मोहन आगाशेंच्या कारकीर्दीतील पुढचे महत्त्वाचे पाऊल म्हणजे बर्लिन मधील ‘ग्रिप्स थिएटर’ त्यांनी मराठीत आणले. बालरंगभूमीकडे अभिनव दृष्टीने पाहणारी आणि अत्यंत वेगळ्या पद्ध्तीने मुलांची नाटके करणारी ‘ग्रिप्स’ ही नाट्य चळवळ. डॉ.मोहन आगाशेंनी या चळवळीतील अग्रगण्य दिग्दर्शक वुल्फ गाँग कोल्नेडर यांना भारतात आणले. काही जर्मन ‘ग्रिप्स’ नाटके मराठीतून सादर केली. पुढे इथल्या तरुण लेखक-दिग्दर्शकांनी ग्रिप्स शैलीची स्वतंत्र नाटके लिहिली व केली. ‘चित्रपटक्षेत्रात डॉ. आगाशे यांचे पदार्पण १९७५ मध्ये ‘सामना’ या चित्रपटातील मारुती कांबळे या छोट्या भूमिकेतून झाले. परंतु त्यांच्या कारकीर्दीला झळाळी मिळाली ती ‘जैत रे जैत,’ या चित्रपटामुळे. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीही गाजविली. जैत रे जैत, सिंहासन, आक्रोश, गंगाजल, त्रिमुर्ती, अब तक छप्पन, असंभव, अपहरण, काय द्यायचं बोला, वळू, देऊळ, अब तक छप्पन २, देऊळ बंद, वेलकम झिंदगी, अस्तु या चित्रपटांत आणि घाशीराम कोतवाल यांसारख्या नाटकांत डॉ. मोहन आगाशे यांनी काम केले आहे. तसेच, एका लग्नाची तिसरी गोष्ट, अग्निहोत्र, गुंतता ह्रदय या मालिकांमध्येही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. मोहन आगाशे १९९७ ते एप्रिल २००२ या कालखंडात हे एफ.टी.आय.आय. या संस्थेचे संचालक राहिले आहेत. सत्यजित रे यांनी एका कार्यक्रमात मोहन आगाशे यांना ‘भारतातील बुद्धिमान नट’ म्हणून गौरविले होते. मोहन आगाशे हे बारामतीच्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते. डॉ. मोहन आगाशे व्यवसायाने मानसशास्त्रज्ञ असून पुण्यातील बी जे वैद्यकीय महाविद्यालयात व ससून रुग्णालयात मानसशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करत असत. १९९६ मध्ये नवी दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीने संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन यांना गौरविले होते. तसेच डॉ. मोहन आगाशे यांना सांस्कृतिक प्रकल्पासाठी जर्मन सरकारने २००२ मध्ये ‘क्रॉस ऑफ आर्डरर मेरीट’ आणि मार्च २००४ मध्ये ‘गटे’ पदकाने सन्मानित करण्यात आले. १९९० मध्ये त्यांना भारत सरकारतर्फे ‘पद्मश्री’ देऊन गौरविण्यात आले. याशिवाय १९९१ मध्ये ‘नंदीकर’ पुरस्कार, १९९८ मध्ये ‘पुणे प्राईड’ असे विशेष पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. मोहन आगाशे यांना ‘अस्तु’चित्रपटातील भूमिकेसाठी श्रेष्ठ अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. २०१८ मध्ये मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार डॉ. मोहन आगाशे यांना मिळाला आहे. तसेच मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने दिला जाणारा सोयगाव येथील रंगभुमीचे प्रणेते लोटू पाटील नाट्यपुरस्कार डॉ. मोहन आगाशे यांना मिळाला होता. २०१२ मध्ये झालेल्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाली होती.
मोहन आगाशे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा