‘प्रिन्स ऑफ कोलकाता’ आणि भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून नोंद झालेल्या भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली चा वाढदिवस.

0
185

८ जुलै
‘प्रिन्स ऑफ कोलकाता’ आणि भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून नोंद झालेल्या भारताचा माजी कर्णधार #सौरव_गांगुली चा वाढदिवस.

जन्म. ८ जुलै १९७२ कोलकातामध्ये.
सौरव गांगुली हा दमदार फलंदाजासोबतच उत्कृष्ट कर्णधारही होता. गांगुली हा भारताच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी समजला जातो. त्याने संघाला एकजुटीने खेळायला आणि लढून जिंकायला शिकवलं. गांगुलीच्या नेतृत्त्वात अनेक खेळाडूंनी आपल्या कारकीर्दीचा सर्वोत्तम काळ पाहिला. महेंद्र सिंह धोनीला पहिल्यांदा संधी सौरव गांगुलीनेच दिली होती. त्यावेळचा सर्वात यशस्वी कर्णधार सौरव गांगुलीने भारतीय संघाच्या भविष्यासाठी सर्वात उत्तम कर्णधार तयार करुन दिला.
सौरव गांगुलीच्या वडिलांचा प्रिंटिंगचा मोठा व्यवसाय आहे, जो आशियात तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोलकातामधील सर्वात श्रीमंत पाच व्यक्तिमत्त्वांमध्ये त्यांचाही क्रमांक लागतो. भारतीय क्रिकेट विश्वात दादा नावाने ओळख असलेल्या सौरवला ‘प्रिन्स ऑफ कोलकाता’ तसंच ‘बंगालचा टायगर’ नावानेही ओळखले जाते. तो आपला पहिला एकदिवसीय सामना वेस्ट इंडिजविरोधात १९९१ मध्ये खेळला होता. तर पहिला कसोटी सामना १९९६ मध्ये इंग्लंडविरोधात ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानात खेळला होता. आपल्या क्रिकेट कारकीर्दीत सौरव गांगुलीने ४९ कसोटी सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्त्व केलं आणि २१ सामन्यात विजय मिळवून दिला. सौरव गांगुलीने वनडे मध्ये दहा हजारांपेक्षा जास्त धावाही केल्या आहेत. ऑक्टोबर २००० मध्ये सौरव गांगुली पहिल्यांदा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार बनला होता. कर्णधार म्हणून त्याने पहिल्या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दोन शतकं केली होती. सौरव गांगुलीच्या आवडत्या क्रिकेटपटूंमध्ये राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर हे भारताचे दोन महान फलंदाज तर वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा आणि ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह वॉ यांचा समावेश आहे. २०१३ मध्ये जगातील सर्वात श्रीमंत दहा क्रिकेटपटूंच्या यादीत सौरव गांगुली सहाव्या स्थानावर होता.