आज २२ जून आज ज्येष्ठ अभिनेत्री भारती गोसावी यांचा वाढदिवस.

0
38
आज २२ जून आज ज्येष्ठ अभिनेत्री भारती गोसावी यांचा वाढदिवस.
जन्म.२२ जून १९४१ पुणे येथे.
भारती गोसावी गेली ६५ वर्षे अविरत मराठी रंगभूमीची सेवा करणाऱ्या रंगकर्मी. भारती बाळ गोसावी या माहेरच्या दमयंती कुमठेकर. ज्येष्ठ विनोदी अभिनेते राजा गोसावी यांचे कनिष्ठ बंधू अभिनेते बाळ गोसावी यांच्या भारती या पत्नी होत. बाळ गोसावी हे नाट्यअेभिनेते होते. त्यामुळे लग्नानंतरही भारती गोसावी यांची नाट्यकारकीर्द चालूच राहिली. १९५८ सालापासून त्या रंगभूमीवर कार्यरत असून, भारती गोसावी यांच्या आई वडिलांना नाटकाची आवड होती. त्यावेळी पुण्याच्या भानुविलास थिएटरमध्ये पृथ्वी थिएटर आणि बालगंधर्वांची नाटके होत. घरी नाटकाचेच वातावरण असल्याने भारतींचा नाटकात प्रवेश झाला. भानुविलास चित्रपटगृह येथे १९५८ मध्ये ‘सौभद्र’ नाटकातील छोटय़ाशा भूमिकेने भारती गोसावी यांचे रंगभूमीवर पदार्पण झाले. या नाटकात पं. छोटा गंधर्व (कृष्ण), गानहिरा हिराबाई बडोदेकर (सुभद्रा) आणि भार्गवराम आचरेकर (अर्जुन) अशा दिग्गजांबरोबर त्यांना शिकता आले. त्या भूमिकेसाठी भारती गोसावी यांना चक्क पाच रुपये मानधन मिळाले होते. शंकर लोहकरे हे त्यांचे पहिले गुरू. भारती गोसावी यांनी १९५८ साली सौभद्र नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले. पदार्पणातच त्यांना छोटा गंधर्वांबरोबर काम करायला मिळाले. ‘सौभद्र’मध्ये भारती गोसावी यांनी रुक्मिणीची भूमिका केली तेव्हा पं. छोटा गंधर्व, पं. राम मराठे, रामदास कामत, प्रसाद सावकार आणि विश्वनाथ बागूल यांनी वेगवेगळय़ा प्रयोगांमध्ये कृष्णाची भूमिका केली होती. ‘संशयकल्लोळ’ नाटकामध्ये त्यांनी कृतिकाची भूमिका केली तेव्हा पं. जयराम शिलेदार, शरद तळवलकर, राजा गोसावी यांनी फाल्गुनराव ही भूमिका केली होती. संगीत नाटकामध्ये काम करणारी गद्य अभिनेत्री अशी त्यांची ओळख झाली. अत्रेसाहेबांच्या सर्वच नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या आहेत. पौराणिक, ऐतिहासिक, संगीत नाटकांसह लोकनाट्य, फार्सिकल, कौटुंबिक, राजकीय, सामाजिक अशा वेगवेगळय़ा नाटकांतून भूमिका करताना भारती गोसावी यांनी अण्णासाहेब किलरेस्कर, गोविंद बल्लाळ देवल, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे अशा दिग्गज नाटककारांची भाषा समर्थपणे पेलली आहे. दरम्यानच्या काळात भारती गोसावी यांनी राज्य नाट्य स्पर्धा, कामगार कल्याण मंडळ, आदी विविध एकांकिका स्पर्धांत भाग घ्यायला सुरुवात केली. विजया मेहता तेव्हा त्यांच्या प्रतिस्पर्धी असत. या स्पर्धांत भारती गोसावी यांना इतकी पारितोषिके मिळाली की शेवटी आयोजकांना त्यांना पत्र लिहून थांबायला सांगितले आणि दुसर्यां नाही संधी मिळू द्या अशी विनंती केली. त्यांनी अत्रे थिएटर्स, कलावैभव, चंद्रलेखा, नाट्यमंदार, पराग आदी नाटक मंडळींच्या नाटकांत कामे केली. काशीनाथ घाणेकर, अविनाश खर्शीकर आदी दिग्गज नायकांबरोबर भारती गोसावी यांनी ‘तुझे आहे तुजपाशी’ मध्ये गीताची भूमिका केली. चित्तरंजन कोल्हटकर, राजा गोसावी, अरुण सारनाईक, निळू फुले, रमेश देव, श्रीकांत मोघे, जयमाला इनामदार, कीर्ती शिलेदार अशा अनेक दिग्गज कलावंतांबरोबर त्यांनी असंख्य नाटकांचे हजारो प्रयोग केले. त्यांनी रंगभूमीसाठी दिलेल्या या योगदानाबद्दल २०१९ मध्ये मराठी नाट्य परिषदेतर्फे त्यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार मिळाला आहे.