४ मे – अभिनेता सुरेश भागवत यांचा वाढदिवस

0
31

४ मे – अभिनेता सुरेश भागवत यांचा वाढदिवस

जन्म – ४ मे १९४२

ज्या एका मालिकेमुळे मोठी प्रसिद्धी मिळाली ते ज्येष्ठ अभिनेते आणि ‘नुक्कड’ लोकप्रिय मालिकेतील ‘घन्शू’ सुरेश भागवत यांचा आज वाढदिवस.

गुपचूप गुपचूप, प्रेम करूया खुल्लम खुल्ला, सिंहासन या आणि अशा अनेक चित्रपटातून त्यांनी साकारलेल्या भूमिका या तितक्याच हटके असलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. एका कलाकाराची अशी ओळख निर्माण झाली ती ‘घंशु भिकारी’ च्या भूमिकेमुळे.

सुरेश भागवत हे कोकणातील देवरुख गावचे. शालेय शिक्षण गावातीलच न्यू इंग्लिश स्कूल मध्ये तेव्हाची दहावी म्हणजे ११ वी मॅट्रिक पर्यंत झाले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला आले. ‘रचना संसद’ महाविद्यालयातून त्यांनी ‘आर्किटेक्चर’ची पदवी संपादन केली. शाळेत किंवा दादरच्या सहकार निवास मध्ये राहात असताना स्नेह संमेलनात त्यांनी नाटकातून काम केले होते.

‘रचना संसद’ मध्ये शिकत असताना आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेसाठी ‘ऑडिशन’ सुरू होती. ‘पुलं’चे भाऊ आणि अभिनेते दिग्दर्शक रमाकांत देशपांडे ऑडिशन घेत होते. रमाकांत देशपांडे यांनी सुरेश भागवत यांना नाटकात काम करणार का? अशी विचारणा केली आणि सुरेश भागवत यांचा नाट्यक्षेत्रात प्रवेश झाला.

भवन्स महाविद्यालयाच्या आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेसाठी सादर केलेल्या गंगाधर गाडगीळ लिखित ‘बंडू, नानू आणि गुलाबी हत्ती’ या एकांकिकेत ‘बंडू’ ही मुख्य भूमिका त्यांनी केली. त्या भूमिकेसाठी सुरेश भागवत यांना ‘उत्कृष्ट अभिनेता’ असे पारितोषिकही मिळाले आणि त्याच वेळी आपण ‘नाटक’ करायचे त्यांनी नक्की केले.

श्री पुं भागवत हे सुरेश भागवत यांचे काका होत. विजय तेंडुलकर एकदा श्रीपुंच्या ‘मौज’ कार्यालयात आले होते. त्यांनी सुरेश नाटकात काम करेल का, असे विजया मेहता यांनी विचारले असल्याचे सांगितले. सुरेश भागवत यांच्या साठी ती मोठी संधी होती. स्पर्धेसाठी तेंडुलकर यांचे ‘कावळ्यांची शाळा’ हे त्यांनी नाटक केले. हे सर्व ‘आर्किटेक्टचर’चे शिक्षण घेत असतानाच हे सुरू होते.

१९६५ मध्ये ‘आर्किटेक्चर’ची त्यांनी अंतिम परीक्षा दिली. पुढची दोन वर्षे सुरेश भागवत यांनी मुंबईतच नोकरी केली. नंतर परदेशात नोकरी करून अनुभव मिळवावा म्हणून संधी मिळताच ते इंग्लंडला गेले. तिथे नोकरी करत असतानाच एकीकडे ‘इंडट्रियलाइज् हाऊजिंग’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. तिथे नोकरी आणि ‘नाटक’ सुरूच होते. ते १९७०-७१ मध्ये भारतात परतले आणि पुन्हा ‘रंगायन’ शी एकांकिका, नाटकाद्वारे जोडला गेले.

‘रंगायन’ मध्ये असताना भागवत यांना दोन चांगल्या संधी आल्या. पण ‘रंगायन’ मध्ये असताना दुसरीकडे कसे काम करायचे? या विचारातून त्यांनी नाही म्हटले. अभिनेते दिग्दर्शक दामू केंकरे ‘तुज आहे तुजपाशी’ नाटकात ‘शाम’ची भूमिका करत होते. त्यांनी सुरेश भागवत यांना, मी या भूमिकेत शोभत नाही असे मला वाटते. ही भूमिका तू करशील का? अशी विचारणा केली होती. बाळ कोल्हटकर यांच्या ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ या नाटकात काम करण्याची संधी आली होती. पण सुरेश भागवत भागवत यांनी तीही नाकारली. पुढे ‘रंगायन’चे ही विभाजन झाले.

अरविंद देशपांडे यांनी ‘आविष्कार’ची स्थापना केली. ‘आविष्कार’च्या ‘शांतता कोर्ट चालू आहे’ नाटकात एका कलाकाराच्या गैरहजेरीत त्याचे काम करण्याबाबत विचारणा झाली आणि सुरेश भागवत यांनी ती संधी सोडली नाही. त्याच सुमारास अभिनेते अमोल पालेकर यांनी ‘चल रे भोपळ्या टुणुक टुणुक’ या नाटकासाठी भागवत यांना विचारणा केली आणि त्यांनी होकार दिला. अच्युत वझे लिखित या नाटकात भागवत यांच्यासह दिलीप कुलकर्णी, सुबोध गाडगीळ, अरुंधती मुर्डेश्वर आदी कलाकार होते.

१९७३ मध्ये राज्य नाट्य स्पर्धेत हे नाटक दुसरे आले. स्पर्धेच्या प्राथमिक आणि अंतिम फेरीत भागवत यांना नाटकातील भूमिकेसाठी ‘उत्कृष्ट अभिनेता’ म्हणून पुरस्कारही मिळाला. पुढे या नाटकाचे काही प्रयोग सादर झाले. रवींद्र नाट्य मंदिरात झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी हिंदीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रयोग झाल्यानंतर कबीर बेदी आत मध्ये आले आणि त्यांनी भागवत यांना चक्क कडेवर उचलून घेतले. सई परांजपे लिखित ‘जास्वंदी’ नाटकात विजया मेहता, दिलीप कोल्हटकर, विक्रम गोखले, विमल जोशी, दिलीप कोल्हटकर यांच्यासह भागवतही होते. माधव वाटवे यांनी विजयाबाईंना सुरेशला या नाटकात का घेत नाही. तो ही भूमिका चांगली करेल, असे सुचविले होते.

नाटकात दोन बोक्यांच्या भूमिकेत सुरेश भागवत व दिलीप कोल्हटकर होते. हे नाटक व भागवत यांची भूमिका गाजली. पं. भीमसेन जोशी यांच्या सारख्या दिग्गज गायकाकडून ‘जास्वंदी’ व ‘चल रे भोपळ्या’ मधील तुझे काम पाहिले आहे, छान. अशी शाबासकी दिली होती. मुंबई दूरदर्शनसाठी गजरा, मराठी नाटक आणि अन्य अनेक कार्यक्रम सुरेश भागवत यांनी केले.

सुरेश भागवत यांच्या आयुष्यात ‘नुक्कड’ मालिकेला महत्त्वाचे स्थान आहे. या मालिकेतील ‘घन्शू भिकारी’ या भूमिकेने त्यांना अमाप प्रसिद्धी, यश दिले आणि नुकसानही केले असे ते एका मुलाखतीत म्हणतात. पुढे नुक्कडची आठवण सांगताना म्हणतात, अझिज आणि सईद मिर्झा तेव्हा ‘नुक्कड’ची जुळवाजुळव करत होते. मालिकेतील विविध भूमिकांसाठी सुमारे २०० कलाकारांना ‘ऑडिशन’ साठी बोलाविण्यात आले होते. ‘ऑडिशन’ दिली आणि ‘नुक्कड’ मधील ‘घन्शू भिकारी’ या भूमिकेसाठी माझी निवड झाली. लेखनात ‘घन्शू ’ दोन-चार भागातच होता. प्रत्यक्ष चित्रीकरणाला सुरुवात झाली आणि ते भाग पाहून मिर्झा बंधूंनी ‘घन्शू’ सह गणपत हवालदार, खोपडी, दगडू ही पात्रे मालिकेच्या प्रत्येक भागात असतील असे नक्की केले. या मालिकेने इतिहास घडविला. मालिकेला आणि आम्हा कलाकारांना अमाप लोकप्रियता मिळाली. आमच्या मूळ नावाऐवजी मालिककेतील भूमिकेच्या नावाने आम्ही ओळखले जाऊ लागलो. इतक्या वर्षांनंतरही त्यात बदल झालेला नाही. महाराष्ट्रात, देशात व परदेशातही ‘घन्शू ’ लोकप्रिय झाला, प्रेक्षकांना आवडला. एखाद्या भूमिकेत कोणताही कलाकार लोकप्रिय झाला की त्याला त्याच प्रकारच्या भूमिका मिळतात. माझ्याही बाबतीत तेच झाले. ‘घन्शू ’ प्रकारच्याच भूमिका मिळत गेल्या. ‘नुक्कड’ व माझी भूमिका लोकप्रिय झाली, मला प्रसिद्धी, यश मिळाले असले तरी अभिनेता म्हणून मला त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करता आल्या नाहीत. माझ्या अभिनयाला वाव मिळेल, तो प्रेक्षकांपुढे येईल अशा भूमिका मिळाल्या नाहीत याची मनात खंत आहे.

‘नुक्कड’ मुळे सुरेश भागवत यांचा बॉलीवूड मध्ये प्रवेश झाला. देव आनंद, अमिताभ बच्चन (शहेनशहा) यांच्या बरोबर भागवत यांना काम करण्याची संधी मिळाली. अर्धसत्य, आक्रोश, घातक, चलते चलते, मेरे दो अनमोल रतन, खिलाडी, इंग्लिश बाबू देसी मेम, फिर भी दिल है हिंदुस्तानी, अंदाज अपना अपना, ठिकाना; आदी हिंदी चित्रपटांतही त्यांचा सहभाग होता.

‘एतराज’ हिंदी चित्रपटात मोठी, ‘लव्ह के लिए कुछ भी करेगा’ या चित्रपटात मुख्य खलनायकाची त्यांची भूमिका होती. पण चित्रपट जेव्हा पडद्यावर आले तेव्हा आपल्या भूमिकांना कात्री लावण्यात आल्याचे त्यांना कळून चुकले. अशा उद्विघ्न करणाऱ्या अनुभवामुळे त्यांनी यापुढे चित्रपट करायचे नाहीत असा निर्णय घेतला आणि ते पुन्हा आपल्या मूळ व्यवसायाकडे वळले.

हिंदी चित्रपटा बरोबरच इंतजार, उम्मीद, मनोरंजन आदी हिंदी मालिकाही त्यांच्या नावावर जमा आहेत. ‘गुपचूप गुपचूप’ या आणि अन्य काही मराठी चित्रपटांतूनही त्यांनी काम केले आहे. २०१८ मध्ये प्रमोद पवार दिग्दर्शित ‘ट्रकभर स्वप्ने’ या मराठी चित्रपटात त्यांनी काम केले होते. सुरेश भागवत यांची मुलगी, जावई दोघेही डॉक्टर असून ते परदेशात स्थायिक आहेत.