यशवंत – एक प्रेरणास्रोत 

0
112

यशवंत – एक प्रेरणास्रोत 

( तिसरे पर्व : भाग – ६१/७५ )

 कविता देवी 

२१ व्या शतकाकडे वाटचाल करत असताना आपल्या भारत देशात अजूनही पुरुषप्रधान संस्कृती जशीच्या तशी आहे. याची प्रचिती वेळोवेळी येतेच.

बऱ्याचदा स्त्रियांना मिळणारी दुय्यम वागणूक, त्यांचे होणारे अपमान, दुखावला जाणारा स्वाभिमान यामुळे त्या मृत्यूला जवळ करतात, याची अनेक उदाहरणे आपल्या पाहण्यात आली असतीलच.

असाच एक प्रसंग उत्तरप्रदेशातील एका विवाहितेच्या जीवनात आला. ती विवाहिता एक वेटलिफ्टिंगची खेळाडू होती. लग्नानंतर तिला आपला खेळ कायम ठेवण्याची इच्छा होती. तिने हे आपल्या सासरच्यांना सांगितले. पण, सासरच्यांनी तिला नकार दिला.

खेळ तिच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला होता. त्यामुळे तिने आपले जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. पुढे काय झाले? ती महिला कोण? जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग !

भारतातील सर्वाधिक स्त्री भ्रूण हत्त्या होणाऱ्या, दुसऱ्या क्रमांकाच्या हरियाणासारख्या राज्यात तिचा जन्म झाला. कुटुंब मोठे आणि घराची परिस्थिती देखील गरीबच. अशा वातावरणात ती मोठी होत होती. तिच्या भावाच्या प्रेरणेने तिने उच्च शिक्षण घेत वेटलिफ्टिंग करण्यास सुरुवात केली.

तिची मेहनत सुरु झाली. काटकसर करून दिवस काढू लागली. टूथपेस्ट संपली तर कडूलिंबाच्या काड्या वापरल्या. खूपच गरज होती म्हणून एकदा मंदिरातील देवासमोरचे १५ रुपये सुद्धा उचलले. पण, ती आपल्या ध्येयापासून परावृत्त झाली नाही.

२००७ पर्यंत ती अनेक स्पर्धा जिंकत राहिली. तिच्या मेहनतीचे फळ तिला २००८ मध्ये मिळाले. तिला सशस्त्र सीमा सुरक्षा दलात खेळाडू कोट्यातून नोकरी मिळाली.

२००९ साली तिचे लग्न उत्तरप्रदेशातील एका तरुणासोबत झाला, जो सशस्त्र सीमा सुरक्षा दलात कार्यरत तर होताच पण, एक खेळाडू देखील होता.

२०१० साली तिने नोकरी सोडली. २०१२ साली ती आई झाली. याच काळात तिच्या सासरच्यांनी तिला खेळ बंद करून ‘चूल आणि मूल’ यावर लक्ष देण्यावर दबाव निर्माण केला.

खेळ तिच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला होता. शेवटी तिने आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. पण, ती वाचली. इतकं सारं महाभारत घडल्यानंतर मग सासरचे शहाणे झाले.

ती नव्या जोमाने तयारीला लागली. २०१६ साली दक्षिण आशियाई खेळात, ७५ किलो वजनी गटात, वेटलिफ्टिंग मध्ये तिने सुवर्णपदक मिळविले.

२०१७ साल तिच्यासाठी बरंच काही घेऊन आलं. तिला यश, पैसा आणि प्रसिद्धी मिळाली. पण, वेटलिफ्टिंग मध्ये नाही बरं का. ती आता एका नव्या खेळाकडे वळली. ती एका कंपनीशी जुळली. तिथेच तिला ट्रेंनिग मिळाले.

तिने घाम गाळायला सुरुवात केली. तेथील तिचे गुरु होते दि ग्रेट खली. कंपनी होती CWE अर्थात कॉन्टिनेन्टल रेसलिंग एंटरटेनमेन्ट. इथं ती एक महिला पैलवान म्हणून, ‘हार्ड केडी’ या नावाने प्रसिद्धी झोतात आली.

हा खेळ तिच्या जीवनातील टर्निंग पॉईंट ठरला. हा खेळ तिच्या WWE (वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेन्ट) मधील प्रवेशाचे तिकीट बनले. तिने WWE त प्रवेश केला आणि WWE त प्रवेश करणारी ती पहिली भारतीय महिला पैलवान बनली. ती पैलवान म्हणजे “कविता देवी”.

प्रचंड गरिबी, त्यामुळे करावा लागलेला संघर्ष अन् चोरी, लोकांची बोलणी ऐकणे, घर आणि मूल सांभाळत, घरगुती हिंसाचार, स्त्री म्हणून हेटाळणी होणे, दुय्यम वागणूक या आणि यासारख्या अनेक संकटांना तोंड देत, कविता देवी इथंपर्यंत आल्या आहेत.

आपल्या कडे पाहून मुलींना कोणताही संकोच वाटू नये. यासाठी त्या WWE च्या रिंगणात त्या सलवार परिधान करून कुस्ती खेळतात. त्यांचा हा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायक असा आहे. म्हणूनच त्या एक यशवंत आहेत.