४ मे – रंगकर्मी दिलीप कोल्हटकर स्मृतिदिन

0
30

४ मे – रंगकर्मी दिलीप कोल्हटकर स्मृतिदिन

जन्म – ३ सप्टेंबर १९४६ (सांगली)
स्मृती – ४ मे २०१८

मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेल्या ‘मोरुची मावशी’ या नाटकाचे दिग्दर्शक आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप भालचंद्र कोल्हटकर यांचा आज स्मृतिदिन.

दिलीप भालचंद्र कोल्हटकर हे मूळचे सांगलीचे. बँकेतील नोकरीमुळे आंतर-बँक नाटय़स्पर्धा, एकांकिका, प्रायोगिक रंगभूमी, राज्य नाटय़स्पर्धा ते व्यावसायिक रंगभूमी असा त्यांचा स्वाभाविक प्रवास घडला. आणि या प्रत्येक मंचावर त्यांनी आपल्या यशस्वी पाऊलखुणा उमटविल्या.

नाटककार बाळ कोल्हटकर आणि नटवर्य चित्तरंजन कोल्हटकर यांच्यासारख्या तालेवार रंगकर्मीचा घराण्यातूनच वारसा लाभला असला तरी त्यांच्या पुण्याईवर दिलीप कोल्हटकर कधीच विसंबले नाहीत. त्यांचे झळझळीत नाटय़कर्तृत्व हे स्वयंप्रकाशित होते. ज्याकाळी व्यावसायिक रंगभूमी हाच आपल्यातला हुन्नर आणि प्रतिभा दाखविण्याचा एकमेव मार्ग होता अशा काळात दिलीप कोल्हटकरांनी त्यावर अधिराज्य गाजवले.

‘राजाचा खेळ’, ‘षड्ज’, ‘सप्तपुत्तुलिका’ यांसारखी वेगळ्या धाटणीची नाटके करणाऱ्या दिलीप कोल्हटकरांनी राज्य नाटय़स्पर्धेत ‘ययाति’ हे तब्बल सहा तासांचे, पाच अंकी नाटक सादर करून एकच खळबळ उडवून दिली होती. आश्चर्य म्हणजे या नाटकाचे पाचही अंक वेगवेगळ्या नाटककारांचे होते. मूळ संस्कृत नाटकातील एक अंक, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या ‘संगीत विद्याहरण’ मधील एक अंक, वि.वा. शिरवाडकरांच्या ‘ययाति आणि देवयानी’तील एक अंक, गिरीश कार्नाडांच्या ‘ययाति’ मधील एक अंक आणि अच्युत वझे यांच्याकडून लिहून घेतलेला एक अंक असे एकूण पाच अंकी हे नाटक राज्य नाटय़स्पर्धेतील नियमांमुळे जरी बाद ठरले असले तरी एक आगळा ‘प्रयोग’ म्हणून ते अजूनही जाणकारांच्या स्मरणात आहे.

‘उभं दार, आडवं घर’ मध्ये अशा तऱ्हेचा सेट त्यांनी तयार केला होता, की जो हळूहळू कोसळत असे. विजया मेहता यांच्या गाजलेल्या बहुतेक नाटकांची प्रकाशयोजना त्यांचीच असे. नाटक कसे ‘दिसावे’ याचा विचार त्यांच्या प्रकाशयोजनेत असे. विजयाबाईंच्या ‘शाकुंतल’ मध्ये त्यांनी विदुषकाची भूमिका केली होती. तसेच ‘जास्वंदी’ मधील त्यांची बोक्याची भूमिकाही गाजली. विजया मेहता आणि पं. सत्यदेव दुबे अशा परस्परविरोधी ‘स्कूल्स’चे ते विद्यार्थी होते.

प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवरील मुशाफिरीत त्यांनी अनेक लोकप्रिय नाटकांचे दिग्दर्शन केले. त्यांची ‘कवडी चुंबक’, ‘राजाचा खेळ’, ‘मोरुची मावशी’, ‘बिघडले स्वर्गाचे दार’ ही नाटकं विशेष गाजली. मराठी रंगभूमीवर करड्या शिस्तीचे दिग्दर्शक म्हणून ते ओळखले जात होते. त्यांनी ‘पार्टी’ या हिंदी सिनेमात अभिनय केला होता. तर ‘शेजारी शेजारी’ आणि ‘ताईच्या बांगड्या’ या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. ‘चिमणराव गुंड्याभाऊ’ या मराठी चित्रपटातही त्यांनी अभिनय केला होता. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या मोरूची मावशी या पुनरुजीवीत नाटकाला घवघवीत यश मिळाले. सुयोग ही संस्था त्यामुळे स्थिरावली.

विजय चव्हाण ला मावशी ने स्टार चा दर्जा दिला. प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन यांच्या कारकिर्दीची सुरुवात या मावशीने झाली. चित्रपट आणि टीव्हीचा पडदाही त्यांनी वर्ज्य मानला नाही. तिथेही आपला ठसा उमटवण्यात ते यशस्वी झाले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने गोपीनाथ सावकार पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव केला होता. असा त्या काळात गाजलेला माणूस नंतर एकदम पडद्यामागे गेला. डोंबिवलीतुन त्यांनी पुण्याला स्थलांतर केले. मधल्या काळात काहीच बातमी नव्हती, पण अचानक २०१७ साली पुण्यात दिपाली कोल्हटकर यांच्या पत्नीचा घरगड्या कडून खून झाला. तेव्हा दिलीप कोल्हटकर यांचा पत्ता रसिकांना लागला. अनेक वर्षांपासून ते bedridden होते.

दिलीप कोल्हटकर यांचं ४ मे २०१८ रोजी निधन झालं.