०६ एप्रिल  गीतकार प्रवीण दवणे यांचा वाढदिवस

0
23

०६ एप्रिल  गीतकार प्रवीण दवणे यांचा वाढदिवस

जन्म – ६ एप्रिल १९५९

ज्येष्ठ मराठी साहित्यिक, सुप्रसिद्ध गीतकार, प्रतिभावंत प्राध्यापक प्रवीण दवणे यांचा वाढदिवस.

दवणे सरांनी आपल्या हस्ताक्षर संग्रहासाठी पत्र पाठविले, त्यात लिहिलेय…

प्रिय श्री. निकेत,
जगणेच गाणे असावे !
हीच हार्दिक शुभेच्छा !
सही

आणखी एक आठवते त्यावेळी मी नियमित दवणे सरांना पत्र पाठवायचो. एका पत्रात त्यांनी लिहिले होते…
कोकणातून आलेल्या पत्रातील शब्दांना आंबा-फणसाचा सुगंध येतो. (एक आठवण)

प्रवीण दवणे यांनी आपल्या बालवयातच लेखनासाठी प्रारंभ केला. प्रवीण दवणे हे ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे येथे गेली तीस वर्षे अध्यापन करत आहेत. प्रवीण दवणे यांनी विविध माध्यमांतून वाड्मयच्या विविध प्रकारचे लेखन केले आहे. त्यांच्या प्रकाशित ग्रंथसंपदा सुमारे साठ पुस्तके प्रवीण दवणे यांच्या नावावर आहेत.

“सावर रे !”, “स्पर्शगंध”, “रंगमेध”, “गंधखुणा”, “हे शहरा” यांसारखी अनेक रसिकप्रिय काव्यसंग्रह, लेखसंग्रह प्रवीण दवणे यांच्या नावे प्रसिद्ध झाले आहेत. तर “आई परत येते”, “स्माईल प्लीज”, “श्रीयुत सामान्य माणूस”, “प्रिय पप्पा” ही नाटके रंगमंचावर आली आहेत. प्रवीण दवणे यांनी ठकास महाठक, झपाटलेला, आम्ही असू लाडके, आम्ही सातपुते, शुभमंगल सावधान, अदला बदली अशा सुमारे १२५ मराठी चित्रपटासाठी गाणी लिहिली आहेत. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यापासून ते साधना सरगम यांच्यापर्यंत आणि सुरेश वाडकरांपासून ते शंकर महादेवन यांच्यापर्यंतच्या सर्व दिग्गज गायकांनी ती गायली आहेत. त्यांनी अनेक भावगीते व भक्तिगीते गाणी लिहिली आहेत.

प्रवीण दवणे हे त्यांच्या कविता, लेख, लेखमाला यासाठी प्रसिद्ध आहेतच, पण त्याही पेक्षा ते एक सामजिक जाणीव असलेला माणूस म्हणून जास्त प्रसिद्ध आहेत.

प्रवीण दवणे यांना सर्वोत्कृष्ट वाडम़याचा राज्यपुरस्काराचा पुरस्कार, ठाणे ग्रंथालयाचा रेगे पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा शांता शेळके सरस्वती पुरस्कार असे अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

आपल्या ठाण्याविषयी बोलताना प्रवीण दवणे म्हणतात की, कालचे ठाणे हिरवळीचे, नाते संबंधांचे, घरोब्याचे नाते जपणारे होते. आजचे ठाणे ट्रॅफिक जॅमचे, प्रदूषणाचे आणि माणूसपण तुटलेले वाटते, असं जर कुणाला वाटत असेल तर त्यात काही चुकीचं नाही. हा बदल अपरिहार्य आहे. ठाण्यातल्या समस्यांवर आपलं प्रशासन योग्य त्या उपाययोजना करताना दिसत आहे. सध्या ठाणे हे परिवर्तनाच्या प्रक्रियेतून जात आहे. पण असं असलं तरी ठाण्यातली सांस्कृतिक जाणीव ही कधीच कमी होणारी नाहीये आणि त्यामुळेच उद्याचे ठाणे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर भारताचे भूषण ठरेल यात कोणतेही दुमत नसावे.

मा.प्रवीण दवणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !