महाराष्ट्रात कुठल्याही क्षणी लॉकडाऊनची घोषणा; राज्य सरकारचा निर्णय झाल्यात जमा!

0
25

महाराष्ट्रात कुठल्याही क्षणी लॉकडाऊनची घोषणा; राज्य सरकारचा निर्णय झाल्यात जमा!

लॉकडाऊन हा उपाय नसला, तरी कोरोना संसर्गाची साखळी तोडायला दुसरा उपाय नाही. त्यामुळे उद्या-परवा काही कडक निर्बंध लावावे लागतील.  वेगळा काही उपाय मिळाला नाही, तर लॉकडाऊनला पर्याय नाही, असा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी फेसबुक लाईव्हदरम्यान दिला होता. परंतु, कोरोना रुग्ण वाढल्यास डॉक्टर आणि नर्सेस आणायचे कुठून?, या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं ठोस उत्तर मिळत नसल्यानं राज्यात कुठल्याही क्षणी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते, अशी माहिती मंत्रालयातील अत्यंत वरिष्ठ आणि विश्वसनीय सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने हालचालीही सुरू केल्याचं समजतं.

काल जनतेला संबोधित केल्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करून त्यांची मतं जाणून घेतली. संपूर्ण लॉकडाऊन न करता, वाढती रुग्णसंख्या रोखता येईल का, यादृष्टीने विचारविनिमय करण्यात आला. टेस्टिंग सेंटर्स, बेड्स, हॉस्पिटल्स, ऑक्सिजन पुरवठा या सुविधा वाढवणं प्रशासनाने वर्षभरात वाढवल्या आहेत, त्या आणखीही वाढवता येतील. मात्र, रुग्णसंख्येला पुरे पडू शकतील एवढे डॉक्टर-नर्सेस कुठून उपलब्ध होतील, हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्यामुळे लॉकडाऊनशिवाय कुठलाही पर्याय राज्य सरकारसमोर नाही.

राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये याआधीच जिल्हापातळीवर लॉकडाऊन संदर्भातील कडक नियम लागू करण्यात आले आहेत. पुण्यात आजपासून अंशत: लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर बीड, अमरावती, बुलढाणा, सोलापूरमध्येही कडक नियमांची तर काही ठिकाणी विकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे कडक निर्बंध लादूनही कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचं चित्र दिसून आल्यानं आता अधिकृतरित्या संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्याशिवाय सरकारसमोर पर्याय उरलेला नसल्याचं सांगितलं जात आहे