महिला वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण हिच्या आत्महत्या बाबतची सखोल चौकशी करून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी

0
94

महिला वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण हिच्या आत्महत्या बाबतची सखोल चौकशी करून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी

महाराष्ट्र बेलदार भटका समाज संघटनेने केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी

रायगड:-अमूलकुमार जैन

अमरावती येथील मेळघाट व्याघ्र प्रकल्प येथे कार्यरत असणाऱ्या महिला वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण हिने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.याबाबत सखोल चौकशी करून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी महाराष्ट्र बेलदार भटका समाज संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्र बेलदार भटका समाज संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,अमरावती येथील मेळघाट व्याघ्र प्रकल्प येथे कार्यरत असणाऱ्या महिला वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण हिने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या नंतर त्यांची चार पानी सुसाईड नोट सापडली आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या नावे ही सुसाईड नोट असून यात वरिष्ठ अधिकारी जिल्हा वन अधिकारी (डीएफओ)विनोद शिवकुमार यांनी मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे. आपल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी त्यांना मिळणारी अपमानास्पद वागणूक, सतत निलंबित करण्याच्या धमक्या,कर्मचारी आणि मजूर तसेच गावकऱ्यांसमोर शिवीगाळ करणे,मार्च २०२० मध्ये त्यांनी मांगीया येथील अतिक्रमणबाबत मला फोन केला. तू आताच्या आता आरोपीला ताब्यात घे आणि अतिक्रमण हटवं, अशा सूचना दिल्या. यानंतर मी स्टाफला घेऊन घटनास्थळी गेले. त्यावेळी तेथील लोक शिवीगाळ करत होते. आम्ही त्यांनी फोनवर कळवल्यानंतरही ते आम्हाला तुम झूट बोल रहे हो, नाटक कर रहे हो असे म्हणत अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करणे,सुट्टी नाकारणे,पगार न देणे,आदी जाचाला कंटाळून दीपाली चव्हाण हिने आत्महत्या केली आहे.
दीपाली चव्हाण ही बेलदार समाजाची पहिली महिला वनपरिक्षेत्र अधिकारी या पदावर नियुक्ती झालेली महिला होती.तिच्या या कर्तृत्वामुळे बेलदार समाजाच्या महिलांसह इतरांनाही प्रोत्साहन मिळत होते. परंतु या आत्महत्येमुळे बेलदार समाजातील मुलावर शिक्षणाच्या बाबतीत विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.समाजातील मुलावर शिक्षणाच्या बाबतीत विपरीत परिणाम होऊ नये म्हणून लवकरात लवकर कारवाई होणे आवश्यक आहे.केंद्र सरकार हर बेलदार समाजाच्या पाठीशी उभे राहत दिगवंत दीपाली चव्हाण यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन दिलासा देण्यात यावा.
एक महिला अधिकारी हिला वरिष्ठांकडून मिळालेली अशी वागणूक तसेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्याकडे वारंवार तक्रार करूनदेखील त्याकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत कोणत्याही प्रकारची चौकशी न करणे,वरिष्ठ अधिकारी जिल्हा वन अधिकारी विनोद शिवकुमार यांच्याकडून दिगवंत दीपाली चव्हाण यांना होणारा सततचा मनस्ताप व राजकीय पदाधिकारी यांच्याकडून सतत होत असलेला दबाव,यामुळे दीपाली चव्हाण हिने आत्महत्या केली आहे. जंगलात होणारा आर्थिक घोळ,राजकीय, अधिकारी वर्गाचा सहभाग हेही या तपासात येणे गरजेचे आहे.
तरी सदर प्रकरणाशी संबंधित सर्व दोषींवर योग्य ती कारवाई करून अमरावती येथील मेळघाट व्याघ्र प्रकल्प येथे कार्यरत असणाऱ्या दिगवंत महिला वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण हिला आणि तिच्या कुटुंबियांना योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरीसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण हिचा भ्रष्ट व्यवस्थेने बळी घेतला. विविध पद्धतीने तिला त्रास देण्यात आला ज्याचा सविस्तर उल्लेख तिच्या पत्रात आहे. डीएफओ शिवकुमार याने तिच्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा ही प्रयत्न केला. तिला अपमानित केल जात होतं. वांरवार डीएफओ शिवकुमार संदर्भात केलेल्या तक्रारींवर वन संरक्षक रेड्डी यांनी कारवाई का केली नाही त्यांनी जर कारवाई केली असती तर दीपाली वाचली असती ही आत्महत्या नाही तर हत्या आहे. डीएफओ शिवकुमार व वनसंरक्षक रेड्डी दोघांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा:-राजू उर्फ राजेंद्र साळुंके.राज्यध्यक्ष,महाराष्ट्र बेलदार भटका समाज संघटना.