राज्यात लॉकडाऊनला वाढता विरोध

0
46

राज्यात लॉकडाऊनला वाढता विरोध

राज्यात वाढणार्‍या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या दृष्टीने तयारीला लागा, अशा सूचना काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. ठाकरेंच्या या भूमिकेला भारतीय जनता पक्षाने तीव्र विरोध दर्शविला आहे. भाजपनंतर मनसेने लॉकडाऊनला विरोध करून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
या संदर्भात मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे  यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, लॉकडाऊन केल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी होते असे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले नाही. तसे काही असेल तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगावे.
गेल्या वर्षी लॉकडाऊन करण्यात आले त्या वेळेस राज्य सरकार आणि सर्वसामान्यांना या संदर्भात कोणतीच माहिती नव्हती, परंतु गेल्या वर्षभरात कोरोनावर कोणते वैद्यकीय उपचार करावे लागतात हे माहीत झाले आहे, तसेच त्याच्यासाठी लागणारी संसाधने, लस उपलब्ध आहे. मग लॉकडाऊन का, असा सवाल देशपांडे यांनी केला आहे.
रात्री 8 वाजेनंतर हॉटेल्स आणि बार बंद करण्यात आले आहेत. हप्ते मिळत नसल्याने हे बंद करण्यात आले आहेत का, असाही सवाल करीत देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्याचप्रमाणे प्रसारमाध्यमांनीही लोकांना बेजबाबदार म्हणून कोरोनाची भीती घालू नये, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
सर्वांत आधी भाजपने लॉकडाऊनला जाहीर विरोध केला आहे. आनंद महिंद्रा यांच्यासह अनेक उद्योजकांनीही लॉकडाऊन पर्याय नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनीही लॉकडाऊनला विरोध करीत तसे झाल्यास अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली आहे. दुसरीकडे सरकारमध्ये कुणाचीही लॉकडाऊन लावण्याची मानसिकता नाही, असे मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
काँग्रेस नेते संजय निरूपम यांनीदेखील संभाव्य लॉकडाऊनवरून संताप व्यक्त केला आहे. ‘चुकीचे नियोजन आहे. पुन्हा लॉकडाउन लागू करण्याचा जो विचार सुरू आहे त्याला आमचा विरोध आहे. कारण गेल्या वर्षी जो लॉकडाउन लागू केला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात लोकांना बेराजगारीचा सामना करावा लागला होता. कारखाने बंद झाले होते आणि व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता, असे निरूपम म्हणाले आहेत.
सव्वातीन कोटी लोक लॉकडाऊनमुळे गरीब झाल्याचा एक रिपोर्ट आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाउन आणून लोकांना त्रास देऊ नका, असे सांगताना निरूपम यांनी निर्बंध लावण्याला समर्थन दर्शविले आहे.