पर्यटन विशेष माथेरान

0
48

पर्यटन विशेष माथेरान

रायगड जिल्ह्यातील माथेरान हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून जराशी वेगळी झालेली ही डोंगर रांग आहे. समुद्रसपाटीपासून साधारण ८०३ मी. म्हणजेच २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान आहे. केवळ पायीच या ठिकाणी हिंडता येत असल्याने अनेक पर्यटकांचा ओढा थोडा कमी आहे. मात्र, घोडा व माणसांनी ओढण्याची दोन चाकी रिक्षा यामुळे येथे पर्यटक वळू लागले आहेत. तशी ही सुविधा अनेक वर्षे सुरू आहे. पिंपरी-चिंचवडपासून १०० किलोमीटरवर तर मुंबईपासून ११० किलोमीटरवर अशा सारख्याच अंतरावर असलेल्या माथेरानकडे पर्यटक न वळतील तर नवलच. शनिवार, रविवार व इतर सुट्टींच्या दिवशी माथेरान पर्यटकांनी फुललेले असते. महाबळेश्वरनंतर थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान प्रसिद्ध आहे. माथेरानमध्ये तीस वेगवेगळी प्रेक्षणीय स्थळे आहेत. आरोग्यदायक व उत्साहवर्धक हवामान, अतुलनीय निसर्ग सौंदर्य व जोडीला थंड हवा यामुळे माथेरानला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पर्यटकांसाठी हॉटेल, एमटीडीसीची निवासगृहे, काही छोटी हॉटेल्स आहेत. या शिवाय मुख्य बाजारपेठेत किंवा नाक्यावर चौकशी केल्यास काही ठिकाणी घरगुती राहण्याची सोय होऊ शकते. बाजार, उद्याने आदीं सोयी आहेत. गावात दवाखाना, शाळा यांसारख्या सुविधाही आहेत. एवढ्या लांबवर सुद्धा मोठी हॉटेल्स व लोकवस्ती पाहून आश्चर्य होते.

संपूर्ण माथा विविध तसेच घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी भरलेला आहे. येथील पठाराची बरीचशी टोके तसेच पूर्व-पश्विम व दक्षिणेकडील कडे कोसळले आहेत. ह्या कडांनाच पॉईंटस् म्हटले जाते. ज्या इंग्रजांनी माथेरान वसवले त्यांनीच या पॉईंटस् ना नावे दिली, त्यामुळे सहाजिकच ती इंग्रजीत आहेत.

माथेरान ही सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून जरा सुटावलेली, वेगळी डोंगर रांग आहे. कल्याणच्या हाजीमलंगपासून ही डोंगर रांग सुरू होते. हाजीमलंगला लागून बदलापूरच्या ‘टवली’ गुहांचे किंवा बदलापूरचे डोंगर आहेत. नंतर ‘नवरानवरी’चा डोंगर लागतो. ह्यावर असणाऱ्या बारीकसारीक सुळक्यांमुळे हा डोंगर लगेच ओळखता येतो. त्यापुढे चंदेरीचा प्रचंड उभा सुळका आणि नंतर ‘म्हैसमाळ’ नावाचा डोंगर लागतो. नंतर आरपार भोक असणारा ‘नाखिंद’ डोंगर लागतो आणि मग ‘पेब’ दिसतो. त्याच्यावरही किल्ल्याचे काही अवशेष आहेत. यानंतर मग माथेरानचा डोंगर सुरू होतो.

माथेरानची झुकझुकगाडी :
माथेरानला जी आगगाडी येते ती या ‘पेब’ आणि माथेरानच्या सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या पॅनोरमा पॉईंटच्या मधील खिंडीतून. या पॉईंटला वळसा घालून ती माथेरानमध्ये शिरते. लहानग्यांच्या आवडीची ही झुकझुकगाडी नेरळवरून वर चढते. २१ कि.मी.चे अंतर दोन तासांत पार करते. ह्या छोटेखानी गाडीतल्या प्रवासाची मौज लुटणे हे माथेरानच्या सहलीतले एक महत्त्वाचे आकर्षण आहे. माथेरानच्या सौंदर्याचे, ताजेपणाचे रहस्य म्हणजे, माथेरान मध्ये गाड्या आणण्यास परवानगी नाही. नेरळहून डांबरी रस्त्याने वर आले, की माऊंटबेरी पॉईंटच्या खाली असलेल्या दस्तूरी नाक्याजवळ गाड्या उभ्या कराव्या लागतात. त्यामुळे माथेरानचे हवामान आणि सौंदर्य प्रदुषणापासून सुरक्षित राहिले आहे. दस्तुरी नाक्यावरून सुमारे १.५ कि.मी. किंवा चालत २०-२५ मिनीटांच्या अंतरावर मध्यभागी मार्केट आहे. आगगाडी मात्र आपल्याला सरळ मार्केट पर्यंत घेऊन येते. बहुतेक हॉटेल्सही ह्या मार्केटच्या अवतीभवती आहेत. असे म्हणतात की १९०७ मध्ये ‘आदमजी पिरभॉय’ नावाच्या पारशी गृहस्थाच्या प्रेरणेने ही झुकझुकगाडी सुरू झाली.

माथैरानमधील लोकांचा उदरनिर्वाह मुख्यत्वे पर्यटकांवर अवलंबून असतो. इथे बहुतांशी लोक हे मराठीच आहेत.

खरेदी :

पर्यटकांची बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आवकजावक होत असल्यामुळे इथल्या मार्केटमध्ये बऱ्याच हस्तकौशल्य असलेल्या वस्तूंचे स्टॉल्स् आहेत. सांबराच्या कातड्याच्या वहाणा व बूट प्रसिद्ध आहेत. तसेच ‘पांढरी’ची काठीही मिळते. रस्त्यावर काही मुले छोट्या मोठ्या चपला, विविध प्रकारच्या टोप्या, शोभेच्या वस्तू, इत्यादी विकताना दिसतात. इथला मध, चिक्की, फज देखिल बर्‍यपैकी प्रसिद्ध आहे.

पार्इंट (स्थळे) :

इंग्रजांनी माथेरान वसवले त्यामुळे बहुतेक पार्इंटसला त्यांनी इंग्रजीच नावे दिली व ती आजही तशीच आहे. पॅनोरमा, गार्बट, अलेक्झांडर, हार्ट, लिटल चौक, ग्रेट चौक, वन ट्री हिल, डेंजर, एको, लँडस्केप, लुईसा, पॉक्युर्पाइन, मंकी, आर्टिस्ट, स्फिंक्स, बार्टल आदी पार्इंटस पाहण्यासारखे आहेत.

वाहनांना बंदी :

माथेरानला घनदाट जंगलाचा विळखा आहे. सुदैवाने या ठिकाणी वाहनांना जाण्यास बंदी आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हे पाऊल उचलणे गरजेचेच होते. नाहीतर हे ठिकाणही कास पठार, महाबळेश्वर आदी पर्यटन स्थळासारखेच प्रदूषणाकडे वळले असते. सध्या तरी गाड्यांना बंदी असल्यामुळे हे ठिकाण प्रदुषण विरहीत आहे. माथेरानचे खास वैशिष्टय असणारी छोटी रेल्वेच येथे जाऊ शकते. पूर्वी वाफेच्या इंजिनावर चालणारी रेल्वे आता डिझेलवर चालविली जाते. इंजिनावर चालणारी ही छोटी गाडी निर्सगाचे दर्शन घडवित आपला नेरळ ते माथेरान असा सुमारे २१ किलोमीटरचा प्रवास दोन तासात घडविते. आम्ही गाडी घेऊन गेल्याने दस्तुरी नाक्यावर गाडीतळावर गाडी लावून पुढे छोट्या ट्रेनने पुढे निघालो. ज्यांना नरेळवरून येणे जमत नाही अशासाठी दस्तुरी नाक्यावरून माथेरान ते मुख्य बाजारपेठ अशा २.५ किलोमीटरसाठी या गाडीतून जाता येते. दस्तुरी नाक्यावरून चालत ३०-३५ मिनिटे लागतात. ही रेल्वे आपल्याला सरळ बाजारपेठेत घेऊन येते. बहुतेक हॉटेल्सही या बाजारपेठेच्या अवतीभवती आहेत. या गाडीचे तिकीट प्रवेशद्वार ओलांडल्यावर काही अंतरावर मिळते. ही रेल्वे जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आली आहे. याशिवाय पर्यटकांच्या सोयीसाठी मुख्य प्रवेशद्वारापासून संपूर्ण माथेरानवर हिंडण्यासाठी घोडे व माणसांनी ओढण्याची दोन चाकी रिक्षा उपलब्ध आहे. ज्यांना पायी फिरणे शक्य नाही अशासाठी माथेरानवर घोडयावरून फिरावे लागते. पण याचे भाडे पाहता आपल्या दोन पायांची डुगडुगीनेच प्रवास करणे उत्तम ठरते. पण तरीही अबालवृद्धांना ही सोय पुरेशी ठरते. संपूर्ण माथा विविध तसेच घनदाट झाडी आणि लाल मातीने संपूर्ण परिसर सजलेला आहे. झाडांवरसुद्धा येथील मातीचा घोड्यांच्या जाण्यायेण्याने फुफाटा उडलेले दिसतो. येथील लोकांचा उदरनिर्वाह पर्यटकांवर अवलंबून आहे. बहुतांशी लोक हे मराठीच आहेत. काही कातकरी, ठाकर, आदीवासी लोकही येथे दिसून येतात.

बाजारपेठेमध्ये विविध हस्तकौशल्यावरील आधारित वस्तू, चप्पल, बूट, पिशव्या, गृहपयोगी वस्तू, शोभेच्या वस्तू विकण्यास ठेवलेल्या आहेत.

वनश्री :
संपूर्ण माथेरानचा परिसर हा विपुल वृक्षांनी सजलेले आहे. गर्द हिरवीगार झाडी हे त्याचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेच. बेहडा, हिरडा, खैर, जांभूळ, आंबा अशी अनेक औषधी वनस्पती येथे आहेत. या हिरवाईमुळे उन्हाळ्यातही उन्हाचा त्रास येथे होत नाही.

राहण्यासाठी खोल्या :
माथेरान मध्ये राहण्यासाठी बऱ्याच सोयी आहेत. दस्तुरी पॉईंटला लागूनच एम्.टी.डी.सी. ची रेस्ट हाऊसेस आहेत.

कसे जावे :

विमान :
मुंबई हे सर्वात जवळचे विमानतळ आहे.

रेल्वे :
मुंबई-नेरळ १०५, तेथून मिनी ट्रेनने माथेरान. पुणे – नेरळ १३३. मुंबई-पुणे मार्गावर नेरळ स्टेशनवर उतरून तेथून छोट्या ट्रेनने माथेरानला जाता येते.

बस :
मुंबई-कर्जत-नेरळ १०८, पुणे-कर्जत १०२, कर्जत-नेरळ १५, नेरळ ते माथेरान ११ पायवाट, नेरळ – माथेरान टॅक्सीही आहेत. वरपर्यंत मोटार मार्गही आहे. मात्र अंतर्गत वाहातूक वाहानाने करता येत नाही.

जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे :
पनवेल खोपोली मार्गावर दोन सुंदर ट्रेक आहेत. शेडुंग येथे अथवा बारवाईस उतरून प्रबळगड (माथ्यावरून माथेरानचे सुंदर दर्शन) व हरसाल डोंगरावरील विशालगड, माथेरान, पॅनोराना पॉईंट खाली पेब माथा.