मुंबईकरांवरील जलसंकट दूर

0
49

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये ९३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेली दहा टक्के पाणीकपातही रद्द होण्याचे संकेत असून, याबाबत सोमवारी निर्णयाची शक्यता आहे.

गेल्या २० दिवसांत तलावक्षेत्रात झालेल्या दमदार पावसाने धरणातील पाणीसाठय़ात भरघोस वाढ झाली. उध्र्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सातही तलावांत मिळून १३ लाख ५६ हजार ७३२ दशलक्षलीटर पाणीसाठा जमा आहे. गेल्या दोन वर्षांतील साठय़ाइतका पाणीसाठा असल्याने पाणीकपात लवकरच रद्द होण्याची शक्यता आहे. ४ ऑगस्टला तलावांतील पाणीसाठा ३४ टक्क्यांपर्यंत घसरल्याने मुंबईत ५ ऑगस्टपासून २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. मात्र, गेल्या २० दिवसांत तलावक्षेत्रांत चांगला पाऊस पडल्याने पाणीसाठा वाढला. पाणीसाठा ८५ टक्के झाल्यानंतर २१ ऑगस्टपासून पाणीकपात १० टक्के करण्यात आली होती. ही उर्वरित १० टक्के पाणीकपातही रद्द होणार आहे.

सात तलावांपैकी तुळशी, विहार, मोडक सागर आणि तानसा हे चार तलाव आतापर्यंत पूर्ण भरले आहेत. उर्वरित तीन तलावांपैकी मध्य वैतरणा व भातसा हे दोन तलाव ९५ टक्के भरले आहेत. उर्ध्व वैतरणा तलाव ८३ टक्के भरला आहे. त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटलेली आहे.