एसटी महामंडळाला राज्य सरकारकडून ५५० कोटी

0
77

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाला (एसटी) ५५० कोटी रुपयांचा निधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी घेतला. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटीपुढील वाढती आर्थिक आव्हाने तसेच महसुलात झालेली घट लक्षात घेऊन एसटी महामंडळाला हा निधी देण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.  एसटी महामंडळाच्या समस्यांबाबत मंगळवारी पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस परिवहनमंत्री अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, वित्त विभागाचे तसेच एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत एसटीला साडेपाचशे कोटी रुपये देण्याचा निर्णय पवार यांनी जाहीर केला.  या निर्णयामुळे एसटी महामंडळापुढील आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे.